PUNE: विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी आवश्यक; शहर, उपनगरांतील गणेश मंडळांना महावितरणचे आवाहन

पुणे – गणेशोत्सवात विद्युत सुरक्षेबाबत संपूर्ण खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन महावितरणने केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येत भाविक मंडळी विविध ठिकाणी श्रीगणेशांच्या दर्शनासाठी, रोषणाई व देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा ही पूर्णतः सुरक्षित व वीज अपघाताचा धोका टाळणारी आवश्यक आहे.
गणेशोत्सवातील मंडप, रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी विद्युत संच मांडणी ही परवानाधारक कंत्राटदारांकडून करून घेतली पाहिजे व काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी अहवाल (टेस्ट रिपोर्ट) सुद्धा घेतला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी धार्मिक उत्सव साजरा करण्यासाठी पथदिव्यांवरून, घरातून किंवा वीजयंत्रणेमध्ये आकडे टाकून घेतलेला अनधिकृत वीजपुरवठा हा कोणत्याही क्षणी वीज अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो. त्यामुळे अधिकृत वीजजोड घेणे आवश्यक आहे, याकडे महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी लक्ष वेधले.
याची घ्या काळजी
- विजेचे वायर्स विस्कळीत स्वरुपात राहणार नाही.
- वायर्स हे वीजभारासाठी सक्षम असल्याची खात्री करावी.
- वायर्स लूज किंवा तुटलेल्या नसाव्यात. टेपने जोडलेल्या वायर वापरू नयेत
- जनरेटर बॉडी व न्यूट्रलसाठी स्वतंत्र
- अर्थिंग जोडणे आवश्यक आहे.
- मीटर, स्विचगिअर्स, विद्युत उपकरणे आदींजवळ
- धोक्याची सूचना देणारा फलक लावावा.
- अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था असणे आवश्यक आहे.





