पुणे : दिवे लावण्याकडे पालिका प्रशासनाची डोळेझाक

मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर 80 खांब नुसतेच उभे
फुरसुंगी – हांडेवाडी-उरुळी दरम्यानच्या मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर उभारण्यात आलेल्या पथदिव्यांपैकी 80 खांबावर दिवेच नाहीत. त्यामुळे दिव्याखाली पर्यायाने रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांपासून अंधार आहे.
रात्रीच्यावेळी या ठिकाणी वाहने अडवून लुटमारीच्या घटना घडत असतानाही दिवे लावण्याकामी पालिकाप्रशासन डोळेझाक करीत आहे. दिवे बसवून हे पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी माजी सरपंच उल्हास शेवाळे यांनी केली आहे.
मंतरवाडी कात्रज-बाह्यवळण मार्गावर कचरा डेपोपुढील भारत पेट्रोल पंप ते हांडेवाडी चौकादरम्यान मार्च महिन्यांत पथदिवे बसविण्यासाठी सुमारे 80 विजेचे खांब उभारण्यात आले. मात्र, या खाबांवर दिवेच बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या या दरम्यान गडद अंधार पसरलेला असतो यातूनच लुटमारीच्या घटना घडत आहेत.
वारंवार मागणी करुनही पालिका प्रशासन वीजेचे दिवे लावत नाही. यातून स्थानिक नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. पालिक ाप्रशासनाने तत्काळ हे पथदिवे सुरु करावेत, अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे.





