राहुरी स्मशानभूमीत लाईटअभावी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार

राहुरी : राहुरी शहरातील गणपती घाट स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना पुरेशा प्रकाश व्यवस्थेचा अभाव आहे. नातेवाइकांना मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशाचा आधार घेऊन अंत्यसंस्कार करावे लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राहुरी नगरपरिषदेचा विद्युत विभाग खडबडून जागा झाला. वीज व्यवस्था पुरेशी असल्याचा दावा करणाऱ्या पालिका प्रशासनाने तातडीने त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला.
या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेषतः, अशा संवेदनशील प्रसंगी नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याची टीका होत आहे. गणपती घाट स्मशानभूमीत पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.
नागरिकांची नाराजी –
नागरिकांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. राजेश नगरकर यांच्या अंत्यविधीप्रसंगी गणपती घाट स्मशानभूमीतील निम्मे दिवे नादुरुस्त असल्याने अंधाराचे साम्राज्य होते. याशिवाय, पाण्याच्या टाकीतही पाणी कधी उपलब्ध असते तर कधी नसते, अशी स्थिती आहे.
युवा नेते सौरभ उंडे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “राहुरी नगरपरिषद प्रशासनाने गणपती घाट स्मशानभूमीत सौरदिव्यांची संख्या वाढवावी. केवळ उंचावर लावलेल्या दिव्यांऐवजी प्रकाशाच्या दिशा गरजेनुसार बदलाव्यात, जेणेकरून आवश्यक ठिकाणी पुरेसा प्रकाश उपलब्ध होईल. नागरिकांना मोबाईल टॉर्चच्या आधारावर अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की यापुढे सहन करावी लागू नये.” नागरिकांनी प्रशासनाला स्मशानभूमीतील सुविधा सुधारण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे. यामुळे प्रशासनावर मूलभूत सुविधा पुरवण्याचा दबाव वाढला आहे.





