Pune : लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने दुचाकीसह रोख रक्कम लांबविली; आरोपीला 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे – लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने दुचाकी आणि बाराशे रुपये जबरदस्तीने लांबविल्या प्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला 8 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
आकाश अशोक उमाप (वय 25, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत हडपसर येथील 26 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. ही घटना 20 मे 2021 रोजी हडपसर परिसरात डी. पी. रस्त्यावरून घडली. फिर्यादी डी. पी. रस्त्यावरून त्याच्या दुचाकीने घरी निघाला होता. त्यावेळी आकाश याने हात दाखवून फिर्यादीना थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी फिर्यादी थांबले असता जवळ येऊन त्याने फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावला.
“तुझ्याकडे जे काही आहे, ते दे नाहीतर तुला कापून टाकीन’ अशी धमकी देत फिर्यादीच्या खिशातील 1 हजार 200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच फिर्यादीना धक्का मारून त्याची दुचाकी गाडी घेऊन पळ काढला होता, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
या प्रकरणी आकाश याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी गुन्ह्यातील दुचाकी जप्त करण्यासाठी, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का?, त्याने अश्या प्रकारे आणखी गुन्हे केले आहेत का? याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.





