Pune : २१ यु ट्युब चॅनेलवर गुन्हा दाखल

पुणे : केंद्रीय शिक्षण विभागाच्या स्टार्स उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) २०२४-२५ साठी घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी (पॅट) परीक्षेतील इयत्ता नववीचा पेपर फुटला असून, पेपर कसा सोडवावा या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याबाबत एससीईआरटीने पेपर फुटल्याची कबुली दिली असून, या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या २१ यू-ट्युब चॅनेलवर गुन्हा दाखल करण्यात आला. या संबंधित यु-ट्युब चॅनेलवर बंदीची कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून प्रतिवर्षी तीन वेळा इयत्ता तिसरी ते नववीसाठी प्रथम भाषा, इंग्रजी तृतीय भाषा आणि गणित या विषयांसाठी शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळा व तुकड्यांमधील विद्यार्थ्यांसाठी पॅट परीक्षा घेण्यात येते. प्रश्नपत्रिका सर्व माध्यमांमध्ये बनवून त्या शाळांना पाठविल्या जातात. एप्रिल २०२५ मध्ये अशी सहावी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले.
त्यानुसार ८ एप्रिल रोजी इयत्ता आठवी व इयत्ता नववीच्या प्रथम भाषा विषयाची परीक्षा पॅट परीक्षा असताना त्यापूर्वीच काही यु-ट्युब चॅनेलवर ही प्रश्नपत्रिका तिच्या उत्तरपत्रिकेसह दाखविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. २१ यु-ट्युब चॅनेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस विभागाच्या मदतीने संबंधित चॅनेल बंद करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे. एससीईआरटीच्या सहायक संचालक सगीता शिंदे यांनी २१ यू-ट्युब चॅनेल व अज्ञात इसमाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. पोलीस निरीक्षक अरुण घोडके हे पुढील तपास करीत आहेत.
संकलित मूल्यमापन चाचणी २ च्या प्रश्नपत्रिका यु-ट्युब चॅनेलवर दाखवून गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी स्कॉलरशिप स्टडी, ट्विटर एडियम, नॉलेज – गंगा, अनिकेत, ए ए क्लासेस, प्रशांत वारे आर्ट्स, झेन झेड लर्निंग बाय एम आर, एच टी स्टडी २.०, लर्न विथ अनु २१, @ सेमी मराठी क्लास, भाषण मित्रा, आर डी क्लब, एस बी सुरज क्रिएशन, एम एच एज्युकेशन, वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र, शिवश्रुष्टी रायटिंग, स्कॉलरशिप स्टडी, मी गुरुजी, एम एच स्टडी, स्टडी टाईम, स्टडी पार्टनर या चॅनलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





