Pune: वडकीतील बैलगाडाशर्यत दुर्घटनेनंतर आयोजकांवर गुन्हा

पुणे – बैलगाडा शर्यतीच्यावेळी लोखंडी रॅक आणि स्टेज कोसळून झालेल्या दुर्घेटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. शर्यतीचे आयोजन करताना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपायोजनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आयोजक संदीप बबन मोडक (वय ४१,रा. वडकी) यांच्या विरुद्ध लोणीकाळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक किशोर हणमंत पवार यांनी फिर्याद दिली आहे. तर, या दुर्घटनेत बाळासाहेब काशीनाथ कोळी (वय ४६), अंकुश साधु चोर (वय ६४) या दोघांचा मृत्यू झाला होता. ही घटना दि. ४ जून २०२३ रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास रामदरा जवळील मैदानात घडली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडकी येथील रामदराजवळील मैदानात संदीप मोडक यांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. शर्यत पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वारा आणि पाऊस सुरू झाला. यावेळी काही लोक स्टेज आणि लोखंडी रॅक खाली बसले. अचानक रॅक आणि स्टेज कोसळले.
त्याखाली जखमी होऊन दोघांचा मृत्यू झाला. आयोजकाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खबरदारी घेतली नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासाच्या चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.





