Pune: उंड्रीतील ऑर्किड शाळेच्या अध्यक्ष, संचालकाविरुद्ध गुन्हा; शासन मान्यता न घेताच शाळा सुरू

पुणे – शासनाची मान्यता न घेता शाळा चालवल्याप्रकरणी उंड्री येथील ऑर्किड इंटरनॅशनल स्कुलच्या अध्यक्ष, संचालक आणि मुख्यध्यापिकेविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही शाळा ईरा एज्युकेशन सोसायटीच्यावतीने चालवण्यात येत आहे. येथे इयत्ता पहिले ते दहावीपर्यंतचे वर्ग अनधिकृत पद्धतीने सुरू होते.
या प्रकरणी ज्ञानदेव आबाजी घोसे (५५, रा. वाघोली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अध्यक्ष जे. डिकोस्टा (रा.बंगळुरू), संचालक समीर गोरडे (रा. विमाननगर) आणि महिला मुख्यध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाची कोणतीही परवानगी किंवा मान्यता न घेता ही शाळा सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आले.
शाळेने पालकांकडून फी वसूल करुन पालकांची फसवणूक केली. शाळा अनधिकृत असतानाही इतर शाळांना दाखल्यांची मागणी करणे, मुलांचे मूळ जन्मप्रमाणपत्र अनधिकृतपणे ताब्यात घेणे, जनरल रजिस्टरमध्ये नावनोंदणी करणे, विद्यार्थ्यांचे उपस्थिती पत्रक बनवणे, शासन मान्यता नसताना असल्याचे भासविणे असे प्रकार केले आहेत. तसेच अनधिकृत शाळा सुरू ठेऊन शासनाचा महसूलही बुडवला आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.





