पुणे : गुटख्यावर बंदी घातलेली असताना शहरात छुप्या पद्धतीने गुटख्याचे वितरण, तसेच विक्री प्रकरणात काळेपडळ पाेलीस, तसेच अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाने (एफडीए) कारवाई करुन ६४ लाखांचा गुटखा जप्त केला. गुटख्याची वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी चार मालवाहू वाहने (पीकअप) पोलिसांनी जप्त केली आहेत. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. संपतराज पेमाराम चौहान (वय ३८, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कारवाईसाठी पोलीस आणि एफडीएचे पथक आल्याची चाहूल लागल्याने गोदामात असलेले तीन ते चार जण पसार झाले. चव्हाण याच्यासह त्याच्याबरोबर असलेल्या चार ते पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी विजयकुमार उणवने यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोदामाच्या बाहेर गुटख्याची वाहतूक करण्यासाठी चार गाड्या ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी गोदामातून ६४ लाख ४४ हजारांचा गुटखा आणि १२ लाख रुपयांची चार वाहने असा ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील आणि एफडीएच्या पथकाने ही कारवाई केली.