नगर । अनधिकृत विनापरवाना फटाका विक्री केंद्रावर कारवाई

राहाता – राहाता नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील विविध प्रभागात सुरू असलेल्या अनधिकृत विनापरवाना फटाका विक्री केंद्रावर कारवाई केली. या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात फटाके जप्त करण्यात आले असून,त्याची शासन नियमानुसार विल्हेवाट लावली जाणार आहे.
राहाता नगरपालिकेने वीरभद्र मंदिराच्या पाठीमागील बाजूस पत्र्यांचे शेड मारून फटाका विक्री केंद्रांना जागा उपलब्ध करून दिलेली आहे. दरवर्षी याच ठिकाणी फटाका विक्रीचे केंद्र असतात. येथे फटाका विक्री करणाऱ्या दुकानदारांना विक्रीबाबतचे शासन नियमांचे तसेच फटाका परवानाचे बंधन घालण्यात आलेले आहे. असे असताना मात्र पालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाण जागेऐवजी अनेकांनी अनधिकृतपणे पालिकेची कुठलीही परवानगी न घेता विनापरवाना फटाका विक्री केंद्र सुरू केले होते. ही बाब मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नेमून शहरातील अनधिकृत विनापरवाना फटाका विक्री केंद्रांवर धाडी टाकून ही बेकायदा व विनापरवाना सुरू असलेली फटाका विक्री बंद केली आहे. वास्तविक नागरी वसाहतीत किंवा त्यालगत अग्नीरोधक उपाययोजना नसताना तसेच फटाका विक्रीचा परवाना न काढता शासन नियमांचे पालन न करता फटाके विक्री करण्यावर बंदी आहे. असे असताना काही दुकानात फटाके विक्री सुरू होती.
फटाके जप्त करून सदर फटाके नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन येथे दफन करून विल्हेवाट लावली जाणार आहे. विनापरवाना व ठरवून दिलेल्या जागेत फटाका विक्री केंद्र न चालविल्याबद्दल संबंधित दुकानदारांवर नगरपालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. कारवाई करण्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाच्यावतीने त्यांना विनापरवाना फटाका विक्री केंद्र चालवू नये, यासह त्यासंबंधीचे कायदा व नियमांच्या बाबत माहिती तसेच सूचना देऊन विक्री केंद्र बंद करण्याबाबत सांगितले होते. यावर काहींनी योग्य ती दखल घेऊन आपली दुकाने बंद केली. मात्र, काहींनी चालू ठेवली होती त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. अनधिकृत फटाका विक्री केंद्रांवर कारवाई करणाऱ्या पथकांमध्ये राहुल खलिपे, नोडल अधिकारी आकाश वाघमारे,अन्वर शहा, प्रविण पगारे, दिलीप सोनवणे, फिलीप दुशिंग, केशव बोठे, अनिल कुंभकर्ण आदींचा समावेश होता





