Pune: ड्रग्स मुक्त पुणे अभियानांतर्गत भारती विद्यापीठ पोलिसांनी मोठी कारवाई करत रिक्षामधून गांजाची वाहतूक आणि विक्री करणारे रॅकेट उध्वस्त केले आहे. या कारवाईत तब्बल ३५ किलोहून अधिक गांजा आणि दोन रिक्षांसह सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मागील चार दिवसांत एनडीपीएस कायद्यांतर्गत सलग दोन गुन्हे दाखल करत भारती विद्यापीठ पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळवून दिले आहे. कारवाई कशी झाली? भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार किरण साबळे, तुकाराम सुतार आणि मंगेश गायकवाड हे १४ मे रोजी रात्री पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी चिंतामणी ज्ञानपीठ परिसरातून हायवेच्या दिशेने येणाऱ्या सीन्स रोड, आंबेगाव बुद्रुक येथे एका रिक्षाचालकाकडे गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चारुदत्त काळुराम चव्हाण (वय २५, रा. गंगानगर, फुरसुंगी, हडपसर) याला ताब्यात घेतले. त्याच्या रिक्षामध्ये सुमारे दोन किलो गांजा आढळून आला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक २३९/२०२६ दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) आणि २९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तपासात मोठा साठा उघड – दरम्यान, अटकेनंतर करण्यात आलेल्या तपासात आरोपीने आणखी मोठ्या प्रमाणात गांजा लपवून ठेवल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी पुढील कारवाई करत सुमारे ६ लाख ४५ हजार रुपये किमतीचा ३३ किलो गांजा जप्त केला. या कारवाईमुळे रिक्षांचा वापर करून शहरात गांजाची वाहतूक आणि विक्री करणारे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वीही कारवाई – विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीही भारती विद्यापीठ पोलिसांनी अशाच प्रकारे रिक्षामधून गांजाची वाहतूक करणाऱ्या एका इसमाविरुद्ध कारवाई केली होती. त्या प्रकरणातही अर्धा किलो गांजा आणि एक रिक्षा जप्त करण्यात आली होती. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील करत आहेत. ‘ड्रग्स मुक्त पुणे’ अभियान – पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुरू केलेल्या ‘ड्रग्स मुक्त पुणे’ अभियानांतर्गत अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलिसांनी विशेष मोहीम राबवून सलग मोठ्या कारवाया केल्या आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक कैलास कोडग, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच महेश बारवकर, मंगेश पवार, किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, अवधूत जमदाडे, सचिन सरपाले, मितेश चोरगोले आणि निलेश खैरमोडे यांचा समावेश होता.