Pune Bribery Case – बढतीवर बदली होऊन कार्यमुक्तीच्या प्रक्रियेत असताना २८ लाखांची लाच घेताना पकडलेल्या सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे. आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या तोटेवार यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना पकडले. या कारवाईत त्यांच्यासह खासगी व्यक्ती संभाजी शिवाजी चव्हाण ( ४७) याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यावर दोघांनाही ६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एसीबीने आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात छापा टाकून संबंधित प्रकरणाची फाईल जप्त केली. वैशाली तोटेवार यांची पोलीस निरीक्षकपदी मुंबई लोहमार्ग विभागात बदली झाली होती. त्यानुसार त्यांना कार्यमुक्त करण्याचा आदेशही काढला होता. कामकाज हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने तांत्रिकदृष्ट्या त्या अद्याप कार्यरतच असल्याचे स्पष्ट झाले. याच दरम्यान त्यांनी लाच घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे आयुक्तांनी कार्यमुक्तीचा आदेश रद्द करून निलंबनाची कारवाई केली. तक्रारदाराच्या अर्जावर तोटेवार या तपास अधिकारी होत्या. आरोपींवर कारवाई करून तक्रारदाराची जमीन परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात त्यांनी आधी २ लाख घेतले होते. त्यानंतर आणखी २८ लाखांची मागणी केली होती. तक्रारीनंतर एसीबीने पडताळणी करून सापळा रचला. २ मे रोजी बंडगार्डन रस्त्यावरील हॉटेल कॉनराडसमोर संभाजी चव्हाण याला २८ लाख गेताना पकडले. त्यानंतर तोटेवार यांनाही ताब्यात घेण्यात आले.