Pune: म्हाडा मुख्याधिकाऱ्यांच्या नावे पावणेतीन लाखांची लाच; कंत्राटी कर्मचाऱ्याला अटक

पुणे – म्हाडा योजनेतील सदनिका फेरवितरण पद्धतीने मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या नावे दोन लाख ७० हजारांची लाच घेणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. पुणे स्टेशन परिसरातील एका हाॅटेलच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजीत व्यंकटराव जिचकार (वय ३४, रा. वाकड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) एका ६० वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली होती. आरोपी अभिजीत म्हाडा कार्यालयात कंत्राटी कर्मचारी आहे. तक्रारदार सेवानिवृत्त आहेत. म्हाडाच्या सोडतीत त्यांना सदनिका मिळाली होती.
पण, त्यासाठी नेमकी किती रक्कम भरायची, याबाबतची माहिती त्यांना नव्हती. सदनिकेची किंमत ९० लाख रुपये होती. त्यामुळे तक्रारदार सदनिका व्यवहारातील हप्ता भरलेला नव्हता. त्यामुळे सदनिका हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली होती. त्यासाठी तक्रारदार यांनी सदनिकेचे फेर वितरण होण्याबाबत आणि त्याचे चलन (आरटीजीएस) चलन मिळण्यासाठी म्हाडाच्या कार्यालयात अर्ज दिला होता. या सर्व प्रक्रियेसाठी जिचकार यने लाच मागितली होती.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक वीरनाथ माने तपास करत आहेत.





