Pune Bribe: एक हजार रुपयांची लाच घेताना न्यायालयातील कर्मचाऱ्याला रंगेहाथ अटक

पुणे – शिवाजीनगर दिवाणी न्यायालयातील बेलिफला एक हजार रुपयांची लाच घेताना लाचुलपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. येथील गेट क्रमांक चारच्या समोरील एका चहाच्या दुकानासमोर ही कारवाई करण्यात आली आहे.
लक्ष्मण नथू काळे (वय.40) असे लाचखोर बेलिफ (कर्मचार्याचे) नाव आहे. याप्रकरणी, 29 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार काळे आणि अन्य एका व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल होताच एकाच दिवसात पथकाने ही कारवाई केली आहे.
तक्रारदार यांनी जमीनीच्या संदर्भात शिवाजीगनर येथील कोर्टात दावा दाखल केला आहे. त्यातील प्रतिवादी यांना कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्याचे काम काळे बेलिफ करत होते. ते समन्स वेळेत बजावून त्याचा रिपोर्ट न्यायलयात देण्यासाठी काळे याने तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाच मागितली.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर काळे याने लाच मागितल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने सापळा लावून त्याला लाच घेताना रंगेहाथ पंचासमक्ष पकडले. ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.




