Pune Bribe News – लाच प्रकरणात विनाकारण तक्रारदाराला सल्ला देणे दुसऱ्या एका बेलिफाच्या अंगलट आले आहे. तक्रारदाराने सल्ला देणाऱ्या बेलिफाविरोधही एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार दुसऱ्या बेलिफला एसीबीने अटक केली. दरम्यान त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सत्र न्यायाधीश जी.ए. रामटेके यांनी दिला आहे. यापूर्वी एका बेलिफला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे. यशवंत एकनाथ गिरमे (वय 53, रा. मांजरी बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आणखी कोणाचा सहभाग आहे का, याच्या शोधासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अनिल कुंभार यांनी केली. या प्रकरणात यापूर्वी लक्ष्मण नथू काळे (वय 40, रा. येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी, 29 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. काळे याच्याकडे प्रतिवादी यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्याचे काम होते. ते समन्स बजावण्यासाठी लाच मागितली होती. ती रक्कम किती द्यायची, असे तक्रारदरांनी विचारले. त्यावेळी दोन-पाच हजार द्या, असे गिरमे याने म्हटले होते. त्यानुसार गिरमे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.