Pune : बॉम्बच्या अफवेने विमानतळावर धावपळ

पुणे – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर, तसेच प्रवाशांच्या लगेजमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल एका खासगी विमान कंपनीला आला होता. या मेलनंतर विमानतळ प्रशासन आणि पोलीसांनी तातडीने झाडाझडती घेतली. मात्र, त्यांना अशी कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. मागील वर्षी विमानतळ प्रशासनाला बॉम्ब ठेवल्याचे तब्बल आठ मेल प्राप्त झाले होते. यावर्षीचा हा तिसरा मेल आहे.
याप्रकरणी स्टार एअर प्रायव्हेट लिमिटेड एअर कंपनीचे कर्मचारी अदनान शेख (२४) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात ई मेल धारकाविरुद्ध विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या ई मेलवर रविवारी रात्री दीडच्या सुमारास हा मेल आला होता. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तो सकाळी पावणेसात वाजता पाहिल्यावर तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला.
त्यानंतर बीडीडीएस, एटीएस आणि सीआयएसएफची पथके दाखल झाली. विमानतळाअंतर्गत सीआयएसएफने पाहणी केली. लगतच्या परिसरात पोलिसांनी डॉग स्कॉडच्या मदतीने तपासणी केली. सुमारे तीन ते चार तास तपासणी सुरू होती. यामुळे प्रवाशांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे करत आहेत.





