Pune: सतर्क रहा, इंटरनेटचा वापर कमी करा : देशपांडे

पुणे : “मोबाइल आणि इंटरनेटमुळे आज आपल्या देशावर सायबर भूत बसले आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यातील निम्मे गुन्हे हे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे होत आहे. तुमची एक चूक सायबर चोरट्यांना संधी देणारी ठरते. त्यामुळे अनोळखी लिंक, फोटो, व्हिडिओ क्लिक करू नये. नेहमी सतर्क रहा, इंटरनेटचा वापर कमी करा,’ असे मार्गदर्शन सायबर तज्ज्ञ व सीए शिरीष देशपांडे यांनी केले.
शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या वतीने स्व. नलीनचंद फुलचंद गांधी यांच्या तिसाव्या स्मृती दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट छात्र पुरस्कार सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यंदाचा सर्वोत्कृष्ट छात्र पुरस्कार तनिष गांधी यांना व्याख्याते व सीए शिरीष देशपांडे आणि ट्रस्टचे विश्वस्त चकोर गांधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बोर्डिंगचे अधीक्षक सुरेंद्र गांधी, अनुराधा गांधी उपस्थित होते. यावेळी पुरस्कार सहभागी विद्यार्थी जय कोचर, संकेत शहा, सिद्धांत शहा, रिषी कर्नावट, मोहित कासलीवाल, प्रतीक देसाणी, समर्थ जैन, समय गंगवाल, ओम बोकाडिया, यश सुराणा, अरिंदम जैन यांचा सन्मान करण्यात आला.
चकोर गांधी म्हणाले, बोर्डिंगची (हाॅस्टेल) खरी ओळख ही तेथील छात्रांमुळे होते. यामध्ये सुरेंद्र गांधी हे गेली ४२ वर्षे या बोर्डिंगमध्ये घडले. केवळ अधीक्षक म्हणून नव्हे तर आतापर्यंत चार ते पाच हजार विद्यार्थ्यांचे आई-वडील म्हणून सुरेंद्र सर आणि भाभी यांनी मुलांना संस्कारक्षम घडविले. आता बोर्डिंग बदलत आहे. लवकरच ५० ते ५२ हजार स्क्वेअर फुटांचे बोर्डिंग, मंदिर होणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समय गंगवाल, अरिंदम जैन यांनी केले.
बोर्डिंगने मला संस्कार, नेतृत्वगुण आणि व्यासपिठावरील धाडस याची शिकवण दिली. सर्वोत्कृष्ट छात्र पुरस्कार माझ्यासाठी अमूल्य ठेवा असून, यशाचे शिखर गाठताना नेहमी प्रेरणा आणि जबाबदारीची जाणीवर करून देणारा आहे.
– तनिष गांधी, सर्वोत्कृष्ट छात्र पुरस्कारार्थी
“एचएनडी’ हा आता ब्रॅंड देशातच नव्हे तर जगभरात पोहचला आहे. येथील विद्यार्थी संस्कार, नेतृत्वगुण घेऊनच बाहेर पडतो आणि प्रेमापोटी दरवर्षी या कार्यक्रमाला येतो. या बोर्डिंगने अनेक अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योगपती घडविले आहेत.
– सुरेंद्र गांधी, अधीक्षक, शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग





