PUNE: एकीकडे बॅरिकेडिंग, दुसरीकडे खोदाई!

पुणे – सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल चौकात उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला साडेसात मीटर रस्ता बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आला आहे. तर, मनपा प्रकल्प विभागाने पुन्हा उर्वरित रस्त्यावर पदपथाचे काम करण्यासाठी खोदाई केली आहे. परिणामी, धायरीकडून येणाऱ्या वाहनांसाठी राजारामपूल चौकात बाॅटलनेक स्थिती निर्माण झाली आहे.
हा पूल धायरीकडून स्वारगेटच्या दिशेने उभारला जात आहे. आता राजाराम पूल चौकात काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे येथील सिग्नल बंद करून, वाहतूक पुढील डिव्हायडरपासून वळवण्यात आली आहे. येथे बॅरिकेडिंग केल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच पदपथ खोदल्याने भीषण कोंडी होत आहे.
सकाळी कार्यालयात जाताना या दुहेरी कोंडीतून वाट काढताना जवळपास आठ लाख वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, हा प्रकार समोर येताच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांंनी तातडने याबाबत प्रकल्प विभागास सूचना दिल्या असून काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
अवजड वाहनांनी कोंडीत भर
धायरीकडून या चौकात आल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला पीएमपी आणि रिक्षा थांबा असल्याने वाहनांना केवळ पाच ते सहा मीटर रस्ता मिळतो. मात्र, त्यात भरीसभर म्हणून प्रकल्प विभागाने पदपथाचे काम करण्यासाठी खोदाई केली आहे. मुख्य रस्त्यावरच दोन ठिकाणी चेंबर खचले आहेत. त्यामुळे एका वेळी दोन मोठी वाहने जाऊ शकतील, जेमतेम एवढाच रस्ता राहिला आहे. तर जिथे पदपथ खोदला आहे, तेथूनच स्वारगेटकडून कर्वेनगरकडे जाणार्या वाहनांना वळसा देण्यात आला आहे. त्यामुळे अवजड वाहने आल्यानंतर प्रचंड कोंडी होत आहे.





