पुणे – मोठा गाजावाजा करत स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी १२४ चौकांत तब्बल १०२ कोटी रुपयांचा खर्च करत अत्याधुनिक एटीएमएस (स्वयंचलित सिग्नल यंत्रणा) बसविण्यात आले आहे. मात्र, महापालिका अथवा स्मार्ट सिटी प्रशासनाकडून वाहतुकीचा कोणताही अभ्यास न करताच या सिग्नलच्या वेळा स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी वाढली असून, वाहनचालक आणि नागरिकांना या कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे पत्र पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना नुकतेच महापालिका आयुक्तांना दिले आहे. या प्रकल्पाची क्षमता वाढवायची असेल तर हे सिग्नल बसविणाऱ्या कंपनीसोबतच्या सेवा करारानुसार पोलिसांचे उपभोक्ता प्रमाणपत्र घेतल्याशिवाय कंपनीस कोणतेही बिल दिले जाऊ नये, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच महापालिका व संबंधित कंपनीकडून वाहतुकीचा तुलनात्मक अभ्यास सादर केला जात नसल्याने नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसविण्यात आलेली ही यंत्रणा वाहतूक पोलिसांशी संबधित असल्याने महापालिकेने ती पोलिसांकडे हस्तांतरित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनास मुंबईतील जूनमध्ये झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानंतर जुलै २०२४ मध्ये झालेल्या बैठकीत या प्रकल्पाचे काम पोलीसांना अपेक्षित व्हावे, या उद्देशाने कंपनीला कामाची बिले देताना पोलिसांचे उपभोक्ता प्रमाणपत्र घेण्याचा निर्णय झाला. त्यानंतर आॅगस्ट २०१७ मध्ये स्वत: पोलीस आयुक्तांनी या सिग्नलची नियंत्रण असलेले स्मार्ट सिटीचे सिंहगड रस्त्यावरील कंट्रोल रूमची पोलीस, महापालिका आणि सिग्नल बसविणाऱ्या कंपनीची संयुक्त बैठक झाली. यावेळी ही यंत्रणा तसेच सिग्नल सक्षमपणे चालविण्यासाठी पोलिसांकडून काही माहिती महापालिका तसेच कंपनीकडून मागविली होती. मात्र, अद्यापही महापालिकेने ही माहिती दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून ही यंत्रणा ताब्यात घेण्यास नकार देत महापालिकेवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांना अपेक्षित असलेली माहिती – सिग्नल असलेल्या रस्त्यावरील वर्दळीच्या व इतर वेळचा वाहनांचा वेग – टिळक रस्ता, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, एफसी रस्ता या ठिकाणी सिग्नलच्या वेळेबाबत पोलिसांशी संपर्क साधणे. – सिग्नलच्या वेळेतील बदलानंतर वाहनांच्या वेगाचा अभ्यास व परिणाम – जवळच्या दोन सिग्नलमध्ये वेळेत बदलाचा आॅफसेट टाइम – जादा वेळ आणि कमी वेळामुळे वाहनांच्या वेगातील बदलाचा अभ्यास