पुणे-ऑस्टिन “सिस्टर सिटी’चा करोनाविरुद्ध संयुक्त लढा

पुणे -मागील काही दिवसांपासून शहरातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत होता. या करोनाच्या विरुद्धच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील पुण्याची “सिस्टर सिटी’ असणाऱ्या ऑस्टिन शहरातील रहिवासी “ऑस्टिन-पुणे सिस्टर सिटी इंटरनॅशनल इनिशीएटिव्ह’द्वारे जोडले गेले आहेत. याद्वारे ना नफा तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या “पुणे सिटी कनेक्ट’च्या माध्यमातून निधी उभारण्यात येत आहे.
सप्टेंबर 2018 मध्ये पुण्याच्या तत्कालीन महापौर मुक्ता टिळक आणि ऑस्टिन शहराच्या कौन्सिल सदस्या ऍलिसन आल्टर यांनी दोन्ही शहरांच्या मैत्री करारावर स्वाक्षरी केली होती.
पुणे आणि ऑस्टिन शहरांतील नागरिकांच्या प्रयत्नांतून सुमारे 15 हजार अमेरिकन डॉलर्स निधी उभा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी गेल्या महिनाभरात 3 हजार अमेरिकन डॉलर्स निधी उभा राहिला आहे. पुणे सिटी कनेक्टच्या परदेशातून थेट देणग्या स्वीकारण्यासाठी “एफसीआरए’अंतर्गत नोंदणी होणे गरजेचे आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पुणे सिटीची नोंदणी होऊ शकल्यास निधी संकलनाच्या कार्यास निश्चित वेग येईल. यादृष्टीने प्रयत्नशील असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
दोन्ही शहरांतील नागरिकांनी उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन ऍलिसन आल्टर आणि पुण्याचे विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. आल्टर यांनी पुणे शहराच्या करोना विरुद्धच्या लढ्यात ऑस्टिन शहर सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली आहे, अशी माहिती “सिस्टर सिटी इंटरनॅशनल इनिशीएटिव्ह’चे सदस्य दीनानाथ खोलकर यांनी दिली.




