Pune : औंधचा अपघात, रस्त्यातील त्रुटीमुळेच – आमदार शिरोळे

औंध – औंध येथे नागरस रोड वरील रस्ता आणि साइडपट्टी समान पातळीत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शहर तसेच उपनगरांत अनेक ठिकाणी रस्त्या आणि पेव्हिंग ब्लाक तसेच साइड पट्टी वर-खाली झाल्याचे प्रकार दिसून येतात, अशा ठिकाणी दुरूस्ती तसेच पदपथांची दुरूस्ती करण्यात यावी, याबाबतचे निवेदन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.
औंध येथील घटनेची गांभीर्याने दखल घेत आमदार शिरोळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महापालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत तसेच रस्ता आणि साइड पट्टी, पेव्हिंग ब्लाक समपातळी कराव्यात.
ज्या रस्त्याचे रुंदीकरण करायचे आहे आणि ज्याची आखणी झालेली आहे, अशा रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने करावे, रस्ते आणि ड्रेनेजची झाकणे ही समांतर पातळीवर करावीत, पदपथ खड्डेमुक्त आणि त्यावरून नागरिकांना व्यवस्थित चालता येईल असे करावेत, प्रत्येक चौकात आसलेल्या पदपथांची वळणे कमी करावीत. पथपथांवरील अतिक्रमणे काढावीत, अशा उपाययोजना आमदार शिरोळे यांनी सुचविल्या आहेत. यावेळी सचिन वाडेकर, अनिल भिसे, उत्तम बहिरट उपस्थित होते.
प्रमुख मागण्या…
औंधमधील वाहतूक नियोजनसाठी पार्किंग व्यवस्था सुलभ कराव्यात. सिग्नल चालू करावेत. सिग्नलच्या आजूबाजूचे पार्किंग बंद करावे, विद्यापीठ चौक ते ब्रेमेन चौक राजभवन रस्ता हा अतिक्रमण मुक्त करावा, भाले चौक, मेडी पॉईंट चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कॉसमॉस बँक चौक, अशा गर्दीच्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस अथवा वॉर्डनची व्यवस्था करावी.





