पुणे – मिळकतकराची थकबाकी रखडल्याने पालिकेकडून जप्त करण्यात आलेल्या आणखी ४२ मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे. या मिळकतींची थकबाकी सुमारे ११ कोटी ११ लाख रु. आहे. या लिलावात असलेल्या मिळकतींचे बाजारमूल्य सुमारे ५८ कोटी रुपयांचे असल्याची माहिती प्रशासनाने दिली. हा लिलाव १० डिसेंबर रोजी आॉनलाइन पद्धतीने केला जाणार आहे. महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी १० हजार कोटींवर गेली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मिळकती सील करण्यासह त्या जप्त केल्या जात आहेत. यात दरवर्षी १,८०० ते २,००० मिळकती जप्त केल्या जात आहेत. त्यात प्रामुख्याने व्यावसायिक मिळकतींचा समावेश आहे. कर भरण्यासाठी महापालिकेकडून वारंवार नोटीस बजावूनहीही काही प्रतिसाद मिळत नाही. तसेच या मिळकतींबाबत न्यायालयात कोणताही दावा अथवा वाद नसल्याने अशा जप्त केलेल्या मिळकतींचा लिलाव करण्याची प्रक्रिया महापालिकेने मागील वर्षीपासून सुरू केली आहे. मागील वर्षीही महापालिकेने सुमारे ५६ मिळकती लिलावात काढल्या. मात्र, त्यातील केवळ दोनच मिळकतींचा लिलाव झाला असून महापालिकेस अवघा ४ कोटींची थकबाकी वसूल करता आलेली आहे. त्यानंतर या वर्षी पुन्हा प्रशासनाने आणखी ४२ मिळकतींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.