पुणे – राज्यात विविध जिल्ह्यात शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यासाठी विशेष सर्वेक्षणची शोध मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत राज्यात तब्बल 25 हजार 204 बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. आता या शाळाबाह्य बालकांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
करोनामुळे शाळा बंद होऊन विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. केंद्र आणि राज्य शासन बालकांच्या नियमित शिक्षणासाठी आणि बालके शाळाबाह्य होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील आहे. तरीही यामध्ये खूप आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
वाढत्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांचे आणि त्यातही मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. रोजगाराची अनिश्चितता, सामाजिक असुरक्षितता आणि पालकांच्या मनातील भीती यामुळे वाढणारे बालमजुरी आणि बालविवाहाचे प्रमाण रोखण्याचे आव्हान समोर उभे आहे. विशेषत: या परिस्थितीत दिव्यांग मुलांबाबतची आव्हाने अधिक वाढत आहेत, असेही शासनाला पाठवलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्याकरता विशेष शोध मोहीम 1 ते 10 मार्च या कालावधीत राबविण्यात आली. औरंगाबाद, अमरावती व बुलढाणा, पिंपरी-चिंचवड व नागपूर महापालिका क्षेत्रांत करोनामुळे ही मोहीम सुरू करता आली नाही. ही क्षेत्रे वगळता उर्वरित जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या सांखिकी माहितीच्या अंतिम अहवाल तयार करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, सहसंचालक दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नांमुळेच अहवाल तयार झाला आहे.
सर्वाधिक शाळाबाह्य मुंबई उपनगरांत
मुंबई उपनगर – 10177, मुंबई – 644, ठाणे – 323, रायगड – 65, पालघर – 2285, पुणे-3278, सोलापूर – 249, अहमदनगर – 463, कोल्हापूर – 101, सातारा – 184, सांगली – 128, रत्नागिरी – 89, सिंधुदुर्ग – 152, नाशिक – 1767, धुळे -170, नंदुरबार -1316, जळगाव- 718, जालना – 71, बीड – 322, परभणी – 119, हिंगोली – 101, लातूर – 32, उस्मानाबाद – 39, नांदेड – 160, अकोला – 1064, वाशिम – 13, यवतमाळ – 167, नागपूर – 239, भंडारा – 19, गोंदिया – 88, चंद्रपूर – 107, गडचिरोली – 277, वर्धा – 177 या प्रमाणे बालके शाळाबाह्य आहेत.
6 ते 14 वयोगटातील विद्यार्थी
कधीच शाळेत न गेलेली बालके – 7, 806.
यात मुले 4,-076, तर मुली 3,730
अनियमित उपस्थिती- 17,397.
यात मुले 9,008, मुली 8,389
विशेष गरजाधिष्ठित- 1,212
बालकामगार- 288
अन्यकारणांनी शाळाबाह्य मुले – 23,704