पुणे – मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे भेंडी, गवार, फ्लॉवर, कोबी, शेवगा आणि सिमला मिरचीच्या भावात १० ते २० टक्क्यंनी वाढ झाली आहे. तर आवकेच्या तुलनेत मागणी कमी असल्यामुळे टोमॅटोच्या भावात घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांची आवक स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली. येथील बाजारात रविवारी (दि. २९) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून मिळून सुमारे ८० ते ९० ट्रक इतकी फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, इंदूर येथून गाजर ९ ते १० टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा २ ते ३ टेम्पो, हिमाचल प्रदेश ३ टेम्पो मटार. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून कैरी २ ते ३ टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे ९ ते १० टेम्पो तर इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून मिळून बटाट्याची ४० ते ४५ टेम्पो यांचा समावेश आहे. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ५०० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ६ ते ७ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार क्रेट्स, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, भूईमूग शेंग १०० ते १२५ गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा सुमारे ७५ ते ८० टेम्पो इतकी आवक झाली.