Pune: ‘व्हीयआयटी’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

पुणे – शहरातील आघाडीचे खासगी विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या विश्वकर्मा विद्यापीठाच्या (व्हीयआयटी) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विद्यापीठाने जागतिक स्तरावरील वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग फॉर इनोव्हेशन (वुरी) २०२४ मध्ये लक्षणीय कामगिरी करत सामाजिक उत्तरदायित्व या श्रेणीमध्ये संपूर्ण जगात ११ वा क्रमांक मिळवत भारतात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तसेच उद्योजकता श्रेणीमध्ये ४५वे स्थान पटकावत जगातील पहिल्या ३०० विद्यापीठांमध्ये दाखल होण्याची किमया साधली आहे.
वुरी रँकिंगमधील सामाजिक उत्तरदायित्व या श्रेणीमध्ये केवळ शैक्षणिक ज्ञान आणि कौशल्यांच्या पलीकडे जाऊन नैतिकता आणि प्रामाणिकतेवर आधारीत संशोधनावर भर दिला जातो. या श्रेणीमध्ये विद्यापीठाच्या उल्लेखनीय अशा विश्वकर्मा युनिव्हर्सिटी सेंटर फॉर कम्युनिकेशन फॉर डेव्हलपमेंट (व्हीयुसीसीडी), सह्याद्री फार्म्स संवाद प्रकल्प, न्यायिक मदत केंद्र आणि महाराष्ट्र अध्यापक क्षमता विकास कार्यक्रम यांचा समावेश होतो. वुरीच्या उद्योजकता या श्रेणीमध्ये विश्वकर्माच्या बौद्धिक संपदा हक्क प्रकल्प, एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प, व्यवसाय प्रारूप विकासावर आधारित बूट कॅम्प या उपक्रमांची विशेष दाखल घेण्यात आली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ जबडे म्हणाले, “विश्वकर्मा विद्यापीठ हे उद्योगजगत, शासन, सामाजिक संस्था आणि लोकसमूह यांच्याबरोबर सातत्याने संवाद ठेऊन त्यांच्या समस्या अपूर्ण गरजा समजावून घेण्याच्या प्रयत्नात असते. या माध्यमातून आम्ही विद्यापीठस्तरावर प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी कायम प्रयत्नशील असतो.’
“शिक्षण आणि समाजसेवेमधील आमच्या तीन दशकांच्या परंपरेचा आम्हाला अभिमान आहे. या काळात, आम्ही सातत्याने विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधन दृष्टिकोनासाठी संसाधने आणि पाठबळ दिले आहे. शिक्षण, संशोधन आणि समाजउपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवणे हे आमचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे.” – भरत अगरवाल, अध्यक्ष, विश्वकर्मा विद्यापीठ




