Pune: विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी) येथील ‘इंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल’ (व्हीईडीसी)तर्फे आयोजित ‘ई-समिट पुणे २६’ हा उद्यमशीलता महोत्सव १७ ते २४ मार्चदरम्यान उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलतेची जाणीव निर्माण करून त्यांना उद्योगजगताशी जोडणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. व्हीआयटीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आणि भव्य उद्यमशीलता महोत्सव ठरला. महोत्सवाची सुरुवात १७ मार्च रोजी ‘स्टार्टअप शोकेस’ने झाली. या उपक्रमात विविध स्टार्टअप्सनी आपले व्यवसाय मॉडेल्स आणि नवकल्पना सादर केल्या. १८ मार्च रोजी ‘पिच परफेक्ट’ तर २० व २१ मार्च रोजी ‘बोर्डरूम’ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी सादरीकरण कौशल्य, उद्यमशील विचारसरणी आणि निर्णयक्षमता प्रभावीपणे सादर केली. २३ मार्च रोजी झालेल्या ‘ई-टॉक्स’ या विशेष सत्रात महाराष्ट्र राज्य भाजपा युवा आघाडीचे अध्यक्ष, रेसिंग चॅम्पियन व उद्योजक कृष्णराज महाडिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलतेसोबतच देशभक्तीची भावना जागृत केली. या सत्रात क्विक हील टेक्नॉलॉजीजचे सहसंस्थापक डॉ. संजय काटकर, ट्रायडंट गेमिंगचे संस्थापक अभिजीत ‘घातक’ अंधारे, स्टार्टअप स्ट्रॅटेजिस्ट व वन कॅपिटल लिमिटेडचे संस्थापक खालिद वानी तसेच बिझनेस लीडर मधु सुदन यांनी आपले अनुभव मांडत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिवसाचा समारोप शुभांकर सलील कुलकर्णी यांच्या ‘टेल ऑफ मेलोडीज’ या बँडच्या सादरीकरणाने झाला. २४ मार्च रोजी ‘समिट शोडाऊन’ या समारोप सोहळ्यात विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर दिशा काटकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात रंगत आली, तर सौरभ भोसले यांच्या स्टँड-अप कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले. ‘फ्यूज सिटी’ या बँडच्या दमदार सादरीकरणाने महोत्सवाचा उत्साहपूर्ण समारोप झाला. या संपूर्ण महोत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलतेची नवी ऊर्जा निर्माण करत भविष्यातील उद्योगजगतासाठी सक्षम पिढी घडवण्याचा संदेश दिला.