Pune : बॉम्बस्फोटाच्या निनावी कॉलने खळबळ

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन, भोसरी आणि येरवडा येथील चैतन्य महिला मंडळ येथे बॉम्बस्फोट करणार असल्याचा कॉल पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी (दि. २०) रात्री आला आणि त्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली. बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ उडाल्यानंतर तात्काळ रेल्वे स्टेशन परिसरासह संबंधित ठिकाणी पोलीस, बीडीडीएस आणि श्वानपथकाने तपासणी करून परिसर पिंजून काढला. प्राथमिक तपासात हा फोन खोडसाळपणाचा प्रकार असल्याचा संशय असून, पोलीस कॉलरचा शोध घेत आहेत.
नियंत्रण कक्षात रात्री एक निनावी कॉल आला. समोरील व्यक्तीने पुणे रेल्वे स्टेशन, भोसरी आणि येरवड्यातील चैतन्य महिला मंडळ येथे स्फोट घडवून आणण्यात येणार आहे. कॉलरने एवढेच सांगून फोन कट केला. या माहितीची गंभीर दखल घेत नियंत्रण कक्षाने संबंधित ठिकाणच्या पोलीस ठाण्यांना तत्काळ सूचित केले. त्यानंतर स्थानिक पोलीस, बॉम्ब शोधपथक आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले.
बंडगार्डन पोलिसांकडून पुणे रेल्वे स्टेशन परिसरात तपासणी करण्यात आली. यादरम्यान निनावी कॉल करणार्या व्यक्तीचा नंबर त्वरित ट्रेस करण्यात आला. त्या क्रमांकाचे विश्लेषण करता तो एक महिलेच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. हा क्रमांकाचा मोबाइल उल्हासनगर-कुर्ला प्रवासात हरवल्याचे समोर आले.
महिलेचा फोन घेऊन कोणीतरी दुसर्याने हा खोडसाळपणा केल्याचा संशय पोलिसांना आहे. संबंधित कॉलरचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.





