Pune : मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या पुरस्कारांची घोषणा

पुणे – अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे देण्यात येणार्या राज्यस्तरीय विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा बुधवारी (दि. २३) करण्यात आली. सन २०२४ या वर्षातील बालसाहित्यातील नऊ विभागांत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी दिली.
कादंबरीसाठी दिला जाणारा लोखंडे-जोशी पुरस्कार कल्पना मलये कणकवली यांच्या सई या पुस्तकाला जाहीर झाला आहे. वा. गो. आपटे पुरस्कार रवींद्र जवादे, मूर्तिजापूर यांच्या चिंटू अस्वल आणि त्याचे घर या कथासंग्रहाला, ग. ह. पाटील पुरस्कार रमेश वंसकर, गोवा यांच्या वार्या वार्या आंबे पाड या कवितासंग्रहाला, दयार्णव कोपर्डेकर पुरस्कार प्रमोद धायगुडे, वाघोशी, खंडाळा यांच्या आबली या किशोर कथासंग्रहाला, लीलाताई भागवत पुरस्कार डॉ. विठ्ठल जाधव, बीड यांच्या एकविसाव्या शतकातील बालसाहित्य या समीक्षा ग्रंथाला, प्रथम प्रकाशनासाठी कारले गुरुजी पुरस्कार राजेंद्र झुंजारराव, पुणे यांच्या चिमण्यांची शाळा या पुस्तकाला.
तर उत्कृष्ट सजावटीचा सर्जेराव जगताप पुरस्कार विजयकुमार चित्तरवाड, छ. संभाजीनगर यांना वाचू गाऊ नाचू आनंदे पुस्तकाच्या सजावटीसाठी जाहीर झाला आहे. दिवाळी अंक- आनंद मासिक हा पुरस्कार छावा दिवाळी अंकाला जाहीर झाला आहे. बालसाहित्य प्रकाशनासाठी दिला जाणारा बा. रा. मोडक पुरस्कार नंदिनी प्रकाशन, पुणे यांना जाहीर झाला आहे.
पुरस्कार वितरण दोन ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता मॉडर्न महाविद्यालयाच्या लता मंगेशकर सभागृहात साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, ग्रंथ प्रसारक प्रसाद भडसावळे यांच्या हस्ते होणार आहेत. याशिवाय या कार्यक्रमात अभिनव वाचन उपक्रमातील विद्यार्थ्यांचा गौरवही केला जाणार आहे. संस्थेतर्फे ऑगस्ट २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी अभिनव वाचन उपक्रम घेण्यात आला होता.





