Pune : दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे रुग्णवाहिका रवाना

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यासोबत वारकऱ्यांच्या सेवेसाठी तीन सुसज्ज रुग्णवाहिका पुण्यातून रवाना झाल्या. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत या उपक्रमाची सुरुवात झाली असून, मोठ्या प्रमाणात डॉक्टर, औषधे आणि आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य सेवा पुरवण्यात येणार आहे.
गणपती मंदिरासमोर रुग्णवाहिकेचे पूजन करून या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि उपक्रमाचे नियोजन करणारे डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, आमदार आणि सरचिटणीस हेमंत रासने, ज्ञानेश्वर रासने यांसह पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाचे यंदा ३६ वे वर्ष आहे.
सासवड मार्गे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोहळ्यासोबत, लोणीमार्गे जाणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोहळ्यासोबत आणि संत सोपानकाका पालखी सोहळ्यासोबत या रुग्णवाहिका असणार आहेत. कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत, आवश्यक आरोग्यविषयक सेवा त्वरित मिळाव्यात, यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले जाते, असे डॉ. परांजपे यांनी सांगितले.





