Pune: बाजार समितीचा अजब-गजब कारभार

पुणे – बाजार समिती प्रशासन मर्जीतील आणि संघटनांचे पदाधिकारी असलेल्या आडत्यांना विशेष सवलत देत मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे, तर दुसरीकडे शेतमाल १५ फुटांच्या बाहेर लावल्यास सर्वसामान्य आडत्यांवर मात्र समिती दंडात्मक कारवाई करते. त्यामुळे बाजारात सामान्य आडत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांनी बाजार समिती प्रशासनावर केला आहे.
फळ भाजीपाला मुख्य गेट नंबर १ च्या उजव्या हाताला थेट शेतकरी ग्राहक विक्रीसाठी अंदाजे दहा ते पंधरा गुंठे जागा राखून ठेवण्यात आली आहे. मात्र, बाजार समितीने एका बड्या आडत्याला शेतमाल विक्रीसाठी ही जागा उपलब्ध करून दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मार्केट यार्डात काही आडत्यांकडे शेतमाल जास्त येतो, त्यामुळे अनेकदा जागेअभावी तो शेतमाल पंधरा फुटांच्या पुढे जातो.
त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा दावा करत बाजार समिती १८ टक्के जीएसटीसह ५ हजार ९०० रुपयांची दंडात्मक कारवाई करत आहे. एका बाजूला बाजार समिती शेतकऱ्यांसाठी आहे, असे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच शेतमालाचे नुकसान का करायचे, असा सवाल काची यांनी उपस्थित केला आहे.
“बाजार समितीकडून सर्व आडत्यांना समानतेची वागणूक मिळत नाही. काही आडत्यांना सवलत दिली जाते, तर १५ फुटांच्या पुढे शेतीमाल ठेवला म्हणून काही आडत्यांकडून दंड वसूल केला जातो. ज्यांना जास्त जागा दिली त्यांच्यावर प्रशासन का कारवाई करत नाही. प्रशासनाच्या या धोरणामुळे सामान्य आडते मात्र भरडले जात आहेत.” – युवराज काची, माजी उपाध्यक्ष, आडते असोसिएशन.
“शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्रीची जागा कोणालाही दिलेली नाही. मात्र, तेथे माल ठेवल्याचे आज निदर्शनास आले. उद्यापासून तेथे माल ठेवण्यास मज्जाव केला जाईल. संबंधित आडत्याला नियमानुसार गाळ्यावर अथवा गाळ्याच्या समोर माल ठेवण्यास सांगितले जाईल.” – डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे बाजार समिती
शेतकरी मालाला विरोध नाही
आडत्यांनी आलेला माल गाळ्यावर उतरवावा. त्यानंतर उतरलेला माल गाळ्याच्या समोर उतरविणे अपेक्षित आहे. मात्र, काही आडत्यांकडून गाळ्यावर डमी ठेवले जातात. शेतकरी माल बाहेर उतरवला जातो. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. याखेरीज शेतकरी माल उतरविणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, तसे बाजार समितीचे धोरण असल्याचे बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी सांगितले.





