हडपसर – प्रभाग क्रमांक १७ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चारही उमेदवार हे विकासाभिमुख नेतृत्व असून परिसराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करणे आवश्यक आहे, असे आवाहन आमदार चेतन तुपे पाटील यांनी केले. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ रामटेकडी, वैदुवाडी- माळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक धाकू कांबळे, हेमलता निलेश मगर, संगीता दत्तात्रय तुपे आणि आनंद अण्णा आलकुंटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच उत्साहात पार पडला. माळवाडी येथील श्री दत्त मंदिरापासून प्रचार रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी माजी उपमहापौर निलेश मगर, शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ईशान तुपे पाटील, दत्तात्रय तुपे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या चारही उमेदवारांना महापालिकेतील प्रशासकीय व विकासकामांचा भक्कम अनुभव असून त्यांनी याआधीही प्रभागात अनेक लोकहिताची कामे मार्गी लावली आहेत. “आगामी काळात प्रभाग क्रमांक १७ च्या विकासाला अधिक गती देण्यासाठी या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा,” असे आवाहन आमदार चेतन तुपे यांनी केले.