अंजली दमानिया यांचा आरोप पुणे – मुंढवा येथील जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना काय अधिकार आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. अजित पवार हा व्यवहार रद्द करणारे कोण? दोन व्यक्तींनी फसवणूक केली असेल, तर थेट व्यवहार रद्द करण्याचा अधिकार त्यांना नाही. खुद्द पंतप्रधान मोदीदेखील अशा प्रकारे व्यवहार रद्द करू शकत नाहीत, असा दावा दमानिया यांनी केला. मुंढवा येथील जमिनीच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या दमानिया यांना अधिकाऱ्यांनी प्रवेश नाकारल्याने मोठा तणाव निर्माण झाला. या प्रकारानंतर संतापलेल्या अंजली दमानिया यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, या संपूर्ण प्रकरणाबाबत आज (बुधवारी) पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला आहे. मुंढवा येथील जागेची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी अंजली दमानिया आज घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र, वरिष्ठांची परवानगी नसल्याचे कारण देत बोटॅनिकल सर्व्हेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गेटवरच रोखले. याबाबत संताप व्यक्त करताना दमानिया म्हणाल्या, मी केवळ माहिती घेण्यासाठी येथे आले होते. आम्हाला फक्त दोन जणांना आत जाऊन पाहणी करू द्या, अशी विनंती केली असता अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावली. संबंधित अधिकारी अत्यंत उद्धटपणे वागले. कोणाचे फोन आल्यावर त्यांनी हा नकार दिला, हे मला माहिती नाही; पण लोक कशासाठी लढत आहेत, याची त्यांना जाणीव दिसत नाही. दरम्यान, जोपर्यंत या प्रकरणातील गुन्हेगारी जबाबदारी तपासली जात नाही, तोपर्यंत हा व्यवहार रद्द करता येणार नाही. याबाबत कायदेशीर बाबी तपासणे गरजेचे आहे. जर हा व्यवहार असाच रद्द केला, तर आपण त्याविरोधात न्यायालयात दाद मागू, असा इशाराही अंजली दमानिया यांनी दिला आहे. या प्रकरणातील समितीचा अहवाल आज अपेक्षित असून, त्यानंतर आपण सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून उद्या सविस्तर पत्रकार परिषद घेऊ, असे दमानिया यांनी सांगितले.