प्रभात वृत्तसेवा पुणे – रात्रभर सुरू असलेला जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुणे विमानतळावरील कामकाज रविवारी मध्यरात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत आठ तास बंद राहिले. विमानतळावर उतरणाऱ्या १४ विमानांना इतरत्र वळविण्यात आले, काही उड्डाणे रद्द झाली तर काही उड्डाणांना प्रचंड विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रविवारी रात्री इंडिगो, अकासा एअर आणि स्पाइसजेट यासारख्या विमान कंपन्यांनी पुणे विमानतळावर अडचणी निर्माण झाल्याचे सांगत अनेक तिकीटे रद्द केल्याची घोषणा केली. प्रवाशांना त्यांच्या संकेतस्थळ किंवा ॲपद्वारे पुन्हा बुकिंग करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अनेक प्रवाशांनी समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली. यावेळी विमान कंपन्यांनी दिलेली अपुरी माहिती आणि तिकीटांचे गगनाला भिडलेले दर याबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केला. पुणे विमानतळावर विमाने उतरू शकत नसल्याने काहींना विमानात अडकून राहावे लागले तर काहींना पुण्याच्या टर्मिनलवर बराच वेळ वाट पाहत बसावी लागली. पावसाचा फटका बंगळूर, दिल्ली, नागपूर इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या विमानांना बसला. पुण्यात आलेल्या सुमारे १० विमानांना पावसामुळे हैदराबाद विमानतळाकडे वळवण्यात आले. दोन विमानांना अहमदाबादकडे वळविण्यात आले, तर मुंबई आणि सुरतला प्रत्येकी एक विमान वळविण्यात आले. यापैकी हैदराबादला गेलेल्या विमानांपैकी ३ विमाने सकाळी पुन्हा पुण्यात आली. सकाळी हवामान सुधारल्यानंतर हळूहळू सेवा पुर्ववत झाली. त्यासाठी वायुसेनेकडून विमानतळ व्यवस्थापनाला मदत करण्यात आली. वायुसेनेसाठी राखीव असलेली सकाळची वेळ नागरी उड्डाणांसाठी खुली करण्यात आली.