प्रभात वृत्तसेवा पुणे – देशातील विविध विमानतळावरून पुण्यात येणाऱ्या विमानांना गेले काही दिवस एक ते दोन तास विलंब होत आहे. रविवारी ४० हून अधिक विमानांना ३० मिनिटे ते दोन तासांपर्यंत विलंब झाला. त्यामुळे पुणे विमानतळावरील वेळेचे नियोजन विस्कळीत झाले असून, या विस्कळीत नियोजनाचा फटका प्रवाशांना बसत आहे. पुण्यातून उड्डाण करणाऱ्या विमानांना उशीर होत असून, प्रवाशांना विमानतळावरच ताटकळत बसून राहावे लागत आहे. लोहगाव विमानतळावरून दररोज दोनशेहून अधिक विमानांची ये-जा होत असते. त्यामधून ३२ ते ३३ हजार प्रवाशी प्रवास करतात. पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रविवारी (दि. ३०) विस्कळीत नियोजनामुळे मनस्ताप सहन करावा लागला. जवळपास ४० हून अधिक विमानांना ३० मिनिटे ते दोन तासांपर्यंत विलंब झाल्याचे दिसून आले. शनिवारी रात्रीपासूनच पुण्यातून उड्डाण करणाऱ्या विमानांना एक ते दोन तास उशीर होत असून, मध्यरात्री १२ ते सकाळी सहा दरम्यान बंगळुरू, चेन्नई, नागपूर, दिल्ली, कोलकाता येथून पुण्यात येणाऱ्या विमानांना उशीर झाल्यामुळे पुण्यातून उड्डाण करणाऱ्या विमानांना उशीर होत आहे. उड्डाणांचे बिघडणारे वेळापत्रक आणि मानसिक-शारीरिक थकवा यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. टर्मिनलमध्ये वाढलेली गर्दी, सुरक्षेच्या रांगा, प्रस्थान-आगमन क्षेत्रातील ताण, पार्किंग-बे अलॉटमेंटवरील ताण यांसारखे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. “उड्डाणांना होणारा अवाजवी विलंबाचा प्रवाशांच्या हक्कांशी आणि विमानतळांच्या कार्यक्षमतेशी थेट संबंध असल्यामुळे आता याकडे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. वेळेवर उड्डाणे करणे ही केवळ एअरलाईन्सची व्यावसायिक जबाबदारी नसून प्रवाशांचा मूलभूत हक्क आहे. उड्डाणांच्या अवाजवी विलंबासाठी एअरलाइन्सनी प्रवाशांना भरपाई देणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक करावे.” – धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ “बाहेरील शहरातून पुण्यात येणाऱ्या विमानांना उशीर होत आहे. त्यामुळे पुण्यातून होणाऱ्या विमान उड्डाणास एक ते दोन तास विलंब होत आहे.” – संतोष ढोके, संचालक, लोहगाव विमानतळ