Pune Air Quality : हवेच्या प्रदूषणाची माहितीच गायब! ‘सफर’चे संकेतस्थळ गेल्या ४ दिवसांपासून बंद
Pune Air Quality : शहरातील वाढते शहरीकरण आणि वाहनांच्या धुळीमुळे हवेचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाच, प्रदूषण मोजणारी मुख्य प्रणाली तांत्रिक अडचणींमुळे बंद.

Pune Air Quality – शहरातील हवेच्या प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी वापरली जाणारी सफर प्रणाली चार दिवस बंद आहे. यामुळे शहराच्या विविध भागांतील प्रदूषणाची स्थिती, एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) आणि प्रदूषक घटकांची पातळी जाणून घेण्याचा महत्त्वाचा स्त्रोत सध्या ठप्प झाला. वाढते शहरीकरण, वाहनांची संख्या आणि धुळीचे प्रमाण यामुळे हवेच्या प्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे.
अशा परिस्थितीत सफर प्रणालीकडून शहरातील विविध केंद्रांवरून गोळा केलेली माहिती नागरिकांना संकेतस्थळावर पाहता येते. तांत्रिक अडचणीमुळे हे संकेतस्थळ गेले चार दिवस कार्यरत नाही. केवळ नागरिकांनाच नव्हे, तर पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, संशोधक आणि विद्यार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवेच्या गुणवत्तेतील बदलांचा अभ्यास, प्रदूषणाचे विश्लेषण आणि संशोधनासाठी सफरचा डेटा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.
संकेतस्थळ बंद असल्याने दैनंदिन डेटा उपलब्ध होत नाही. यामुळे संशोधन आणि विश्लेषणाचे कामही प्रभावित झाले आहे. पर्यावरण अभ्यासकांच्या मते, संकेतस्थळ बंद असणे ही समस्या असली तरी पुण्यातील हवेच्या गुणवत्तेच्या निरीक्षण व्यवस्थेतील मर्यादा हा अधिक गंभीर मुद्दा आहे. शहरात केंद्रीय, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांतर्गत अनेक मॉनिटरिंग केंद्रे असली तरी त्यांपैकी फारच कमी केंद्रांचा डेटा नियमितपणे उपलब्ध होतो. यामुळे तांत्रिक बिघाड दूर करून सफरची सेवा तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी पर्यावरण संस्था, अभ्यासक आणि विद्यार्थी करत आहेत.





