पुणे – पुणे हे सायकलींचे शहर ही ओळख पुसल्याला काळ लोटला; परंतु पुणे ग्रँड चॅलेंज टूरच्या माध्यमातून पुन्हा एकदा तो जुना माहौल शहराच्या काही भागात एक दिवसासाठी का होईना तयार झाला. या टूरमुळे पुण्याच्या प्रदूषणाची पातळी घसरली. यामुळे ‘सायकलींचे शहर’ असताना पुण्याचे हवामान किती शुद्ध असेल, याची झलक यानिमित्ताने पुणेकरांनी अनुभवली. शहरात ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने, पुणे शहर वाहतूक पोलिसांनी जाहीर केलेल्या प्रमुख वाहतूक बदलांमुळे दिवसभर शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले होते. या निर्बंधांमुळे पुण्यातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे (सीपीसीबी) व्यवस्थापित ‘समीर’ ॲपच्या आकडेवारीनुसार, स्पर्धेच्या दिवशी पुण्यातील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ९४ नोंदवला गेला. कारण नोव्हेंबर २०२५ पासून एक्यूआय पातळी सातत्याने १५० च्या वर राहिली आहे. शिवाजीनगर येथील निरीक्षण केंद्रावर, जिथे एक्यूआय पातळी अनेकदा २०० पेक्षा जास्त नोंदवली जाते, तिथे लक्षणीय सुधारणा दिसून आली, एक्यूआय ७९ पर्यंत खाली आला. यामुळे वाहनांची वाहतूक कमी झाल्यावर प्रदूषण कमी होते, हे अधोरेखित होते. या स्पर्धेदरम्यान प्रशासनाने अनेक महापालिका प्रभागांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. याव्यतिरिक्त, पर्यावरण विभागानेही अनेक पावले उचलली, ज्यामुळे शहराच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली. ‘शहरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक पातळीवर आल्याचे पाहून आनंद होत आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही अतिरिक्त आयुक्तांसोबत वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर बैठक घेतली होती. त्यानंतर आम्ही फॉगर वाहनांच्या वेळेत बदल केला, जी पूर्वी दुपारच्या वेळी शहरात फिरत होती. आता ही वाहने पहाटेपासूनच प्रमुख रस्त्यांवर फिरत आहेत. आम्ही शहरातील वायू प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या क्षेत्रनिहाय घटकांवरही लक्ष देत आहोत.’- किशोरी शिंदे, पर्यावरण अधिकारी, पुणे महापालिका