Pune : एआयमुळे अनेक प्रकारच्या निर्मिती करणे सोपे झाले – डॉ. दिपक शिकारपूर
Pune: रामा संस्थेच्या विशेष सभेत मार्गदर्शन; बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचे आवाहन

Pune : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरणारा साक्षर आणि त्याचा वापर न करणारा निरक्षर, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार न करणारे व्यावसायिक आणि उद्योजक स्पर्धेत मागे पडू शकतात. एआयमुळे विविध प्रकारची निर्मिती आणि अनेक कामे अधिक सोपी झाली आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. दिपक शिकारपूर यांनी केले.
जाहिरात, विपणन आणि माध्यम क्षेत्रातील रिजनल अॅडव्हर्टायझिंग मार्केटिंग असोसिएशन (रामा)च्या वतीने बुधवारी आयोजित विशेष सभेत ते बोलत होते. यावेळी रामाचे अध्यक्ष दिनकर शिलेदार, जाहिरात क्षेत्रातील उद्योजक महेश घोरपडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी रामा संस्थेचे संस्थापक संचालक ईश्वर दिवे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेच्या उभारणीत त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
डॉ. शिकारपूर म्हणाले, समाजमाध्यमांवर वैयक्तिक माहिती शक्य तितकी कमी प्रमाणात शेअर करावी. मोबाईल आणि डिजिटल प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांच्या सवयी व आवडींचा डेटा संकलित करून त्यानुसार पर्याय सुचवत असतात. सर्वसामान्यांकडून जमा होणारा हा डेटा अनेक कंपन्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.
सध्या जनरेटिव्ह एआयच्या माध्यमातून अनेक कामे अधिक वेगाने आणि सुलभपणे होत आहेत. एआय पॅटर्न ओळखून क्षणार्धात मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध करून देऊ शकतो. मात्र, त्याला मर्यादाही असून काही वेळा चुकीची माहिती देण्याची शक्यता असते. त्यामुळे एआयने दिलेल्या माहितीची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२०३० ते २०३२ नंतर पारंपरिक शिक्षणपद्धतीत मोठे बदल होण्याची शक्यता असून ज्ञानप्राप्तीसाठी एआय-आधारित चॅटबॉट्स प्रभावी माध्यम ठरतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी एआय, चॅटबॉट, जेमिनी यांसारख्या व्यासपीठांचा प्रभावी वापर कसा करावा, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात दिनकर शिलेदार यांनी जाहिरात क्षेत्रातील बदलांचा आढावा घेतला. बदलत्या काळात जाहिरात संस्थांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
ठळक मुद्दे
*एआयला मर्यादा असून तो काही वेळा चुकीची माहिती देऊ शकतो.
*एआय-निर्मित आणि मानवनिर्मित माहितीतील फरक ओळखणे आवश्यक.
*मुलांना तंत्रज्ञानाचा योग्य आणि जबाबदारीने वापर करण्याचे संस्कार द्यावेत.
*एआयचा गैरवापर टाळण्यासाठी जागरूकता आवश्यक.
*समाजमाध्यमांवरील माहितीचा वापर करून सायबर गुन्हेगार नागरिकांना लक्ष्य करतात.





