Pune: २४ लाख रुपयांचा भेसळ साठा जप्त; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

पुणे – दसरा आणि दिवाळी सणाच्या कालावधीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने पुणे विभागात आणि जिल्ह्यात धडक मोहीम राबवून दूध, गाईचे तूप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा आणि वनस्पती आदी अन्न पदार्थांचा एकूण २४ लाख ७ हजार ९१८ रूपयांचा साठा जप्त केला आहे.
दसरा आणि दिवाळी सणाच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात ४८ तर अन्न आस्थापनेतून अन्न पदार्थांचे एकूण ५५ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तसेच गाईचे तूप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा, वनस्पती आणि भगर आदी अन्न पदार्थाचा एकूण १४ लाख ८८ हजार ३९८ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
पुणे विभागात ८३ अन्न आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आल्या तर अन्न पदार्थाचे एकूण १०२ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. भेसळीच्या संशयावरुन विविध अन्न आस्थापनांवर छापे टाकून जप्ती करण्यात आली. या मोहिमेत भेसळयुक्त अन्न पदार्थाचा ९ लाख १९ हजार ५२० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. दोन्हीही ठिकाणचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कायद्याप्रमाणे पुढील कारवाई घेण्यात येईल.
“अन्न आणि औषध प्रशासन सतर्क असून सणासुदीच्या काळात विक्री करण्यात येणाऱ्या अन्न पदार्थामध्ये भेसळ संदर्भात काही संशय असल्यास जागरुक नागरिकांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा.” – सुरेश अन्नपुरे, सह आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन पुणे विभाग





