पुणे – दिलेली जबाबदारी पार पाडणे ही भाजपमधील शिस्त खूप महत्त्वाची आहे. आमदारकीच्या पाच वर्षांत विविध राज्यांच्या निवडणुकांवेळी तेथे जाऊन काम करणे म्हणजे एकप्रकारे अनुभवांची शिदोरी असते. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्याच गोष्टी पाच राज्यांतील निवडणुकांवेळी शिकायला मिळाल्या, असे आमदार तथा भाजप-महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघाचे उमदेवार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. दरम्यान, हे काम करताना मात्र आपल्या मतदार संघाकडे दुर्लक्ष केले नाही; तर जनसंपर्क कार्यालयातील टीमसोबत फोनवर कायम उपलब्ध होतो, असेही शिरोळे यांनी नमूद केले. सन २०२२ मध्ये गोवा राज्याच्या निवडणुकांवेळी सेंट अॉंड्रे मतदारसंघातील प्रचाराची जबाबदारी पक्षाने सोपवली. त्यावेळी बूथरचना, बैठका, संपर्क, सभा या माध्यमातून तेथे उमेदवार जिंकून आणण्यासाठी प्रयत्न केले. गोव्याच्या आधी पश्चिम बंगालमधील बोलपूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी एप्रिल २०२१ मध्ये पक्षाने सोपविली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीत सुरत जिल्ह्यातील मांगरोल मतदारसंघाची जबाबदारी पक्षाने सोपवली होती. तेथेही याच प्रकारे काम करून पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडल्याचे समाधान असल्याचे शिरोळे म्हणाले. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर विधानसभा मतदार संघाच्या प्रचार यंत्रणेची जबाबदारी पक्षाने सोपवली होती. बेळगाव प्रश्न हा गेल्या काही वर्षांपासून सर्वश्रुतच आहे. परंतु या भागात काम करताना भाषेचा अडसर कधीच आला नाही. पक्षाने वेळोवेळी दाखविलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी नेहमीच प्रामाणिकपणे, मेहनतीने, चिकाटीने पार पाडत आहे आणि यापुढे देखील पार पाडणार आहे, असे शिरोळे म्हणतात. मे २०२३ मध्ये तेलंगणातील निझामाबाद जिल्ह्याची जबाबदारी शिरोळे यांच्यावर तेथील निवडणुकांवेळी सोपवण्यात आली होती. या जिल्ह्यात आर्मुर, निझामाबाद ग्रामीण, निझामाबाद शहर, बोधन, बलकोंडा या पाच मतदार संघांचा समावेश आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील घोराडोंगरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर पक्षाने सोपवली आणि त्यांनी ती यशस्वी पार पाडली. या सर्व ठिकाणी काम करताना आलेल्या अनुभवांचा उपयोग आपल्या मतदार संघात काम करताना होतो, असे शिरोळे यांचे म्हणणे आहे. …तरीही नागरिकांच्या संपर्कात गेल्या टर्ममध्ये देशात विविध मतदारसंघांत काम केले. पण, काही दिवस तिकडे काम केले आणि परत पुण्यात आलो. पुन्हा तिकडे गेलो, असे न करता निवडणूक होईपर्यंत तेथेच राहून काम केले. हे करताना “घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी’ या ओळींप्रमाणे मतदार संघाकडेही लक्ष दिले, असे शिरोळे यांनी सांगितले.