Pune : अभिनेते राहुल सोलापूरकर यांंचा भांडारकरच्या विश्वस्तपदाचा राजीनामा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या पार्श्वभूमीवर अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला आहे. संस्थेनेही तो स्विकारला असल्याची माहिती संस्थेचे मानद सचिव सुधीर वैशंपायन यांनी लेखी पत्राद्वारे कळवली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध विविध राजकीय संघटना आणि पक्षांनी केला आहे. कोथरूड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
कोथरूड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सोलापूरकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय सोलापूरकर यांचे निवासस्थान असलेल्या कोथरूड येथील इमारतीच्या खाली ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेचा राजीनामा दिला आहे. तसेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर आहे. आपली छत्रपती शाहू महाराजांची भूमिका जगभर पोहोचली आहे. त्यामुळे बदनामी करण्याचा आपला कोणताच हेतू नव्हता, असा व्हिडिओ प्रसारीत करून सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितली आहे.





