प्रभात वृत्तसेवा पुणे – भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पार्वती लिंगाप्पा कोळी (५५, रा. वक्रतुंड हाईट्स, मानाजीनगर, नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोळी यांचा मुलगा लक्ष्मण (वय ३६) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्वती कोळी या रविवारी (२१ सप्टेंबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून निघाल्या होत्या. त्यावेळी सेवा रस्त्यावर भरधाव दुचाकीने पादचारी कोळी यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या पार्वती यांना रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता दुचाकीस्वार पसार झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुपसौंदर करीत आहेत.