Pune: मैत्रिणीसोबत मोटारीत गप्पा मारणाऱ्या तरुणाला धमकावून पैसे उकळले; दोन पोलीस निलंबित

पुणे – विधी महाविद्यालय रस्त्यावर मैत्रिणीसोबत मोटारीत गप्पा मारत थांबलेल्या तरुणाला धमकावून २० हजार रुपये उकळणाऱ्या डेक्कन पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश परिमंडळ एकचे प्रभारी पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी दिले आहेत.
गणेश तात्यासाहेब देसाई, योगेश नारायण सुतार अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत. याप्रकरणी एका तरुणाने तक्रार दिली होती. तक्रारदार वारजे भागात राहायला आहे. विधी महाविद्यालय रस्त्यावरील दामले पथ परिसरात तक्रारदार मंगळवारी रात्री मैत्रिणीसोबत मोटारीत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी रात्रपाळीतील पोलीस कर्मचारी गणेश देसाई, योगेश सुतार हे गस्त घालत होते.
देसाई आणि सुतार दोघांनी तुमच्याबद्दल तक्रार आहे, असे त्यांना सांगितले. ‘पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरण न्यायचे नसेल, तर २० हजार रुपये द्या,’ अशी धमकीही त्यांनी दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी देऊन तक्रारदार मोटारचालकाला दुचाकीवर घेऊन देसाई आणि सुतार कमला नेहरू पार्क परिसरातील एका एटीएममध्ये नेले. तेथे त्याच्याकडून २० हजार रुपये काढून घेतले.
या घटनेने घाबरलेला मोटारचालक आणि त्याच्या मैत्रिणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी देसाई आणि सुतार यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात आली.





