Pune : दीडच महिन्यात रस्त्यावर डबक्यांची माळ

पुणे – धायरी येथील उंबऱ्या गणपती चौकातून धारेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता अवघ्या दीड महिन्यापूर्वी करण्यात आला होता. मात्र, मोठ्या पावसात या रस्त्याचा संपूर्ण सत्यानाश झाला आहे. नागरिकांनी ओरड केल्यानंतर महापालिकेने लगेच पॅचअप करून रस्ता सुस्थितीत खटाटोप केला. मात्र, परिसरात सुरू असलेल्या संततधारेने या रस्त्यावर डबक्यांचे जाळे पसरल्याने नागरिक अक्षरशः त्रासून गेले आहेत.
गेल्या काही वर्षांत धायरीतील भैरवनाथ मंदिर ते खडक चौकापर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली होती. त्यामुळे हा रस्ता होण्यासाठी नागरिक सतत मागणी करत होते. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस या रस्त्याला मुहूर्त मिळाला आणि धायरीकरांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यातच काही माजी लोकप्रतिनिधींनी अगदी फ्लेक्स लावून या कामाचे श्रेय घेण्याचाही प्रयत्न केला.
मे मध्येच झालेल्या जोरदार अतिवृष्टीने या नव्या कोऱ्या रस्त्याची अक्षरशः वाट लागली आणि पंधराच दिवसांत महापालिकेने पॅचवर्क करून रस्ता सुस्थिती आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पुन्हा पावसाचा जोर वाढला आणि रस्त्याला केलेली मलमपट्टी वाहून गेली आहे.
गाड्यांचे नुकसान, दुखापती
उंबऱ्या गणपती चौकापासून धारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या या रस्त्यावर वाहनचालकांची चांगलीच वर्दळ असते. नऱ्हे एमआयडीसी, बेनकर वस्ती आणि धारेश्वर मंदिराच्या पाठीमागे वाढलेल्या नागरीकरणामुळे नागरिक या रस्त्याचा जास्तीत जास्त वापर करतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गेल्या काही दिवसांत गाड्या घसरून पडणे आणि पाठदुखीसह गाड्यांचेही नुकसान होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
का टिकत नाही रस्ता
हा दहा ते १२ फुटांचा अरुंद रस्ता आहे. त्यात खडक चौकाकडन मोठ्ठा उतार असल्याने मोठ्या पावसात रस्त्यावर घोट्याच्या वर पाणी चढून रस्त्याचा ओढा होऊन जातो. रस्त्याकडेला पाणी वाहून जाण्यासाठी नाले नसल्याने बऱ्याचदा अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये, दुकानात पाणी घुसते. रस्ता सतत पाण्याखाली असणे आणि पाणी वाहून जाण्यासाठी नाला नसल्यानेच हा रस्ता टिकत नाही, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.





