पुणे – खडकवासला, टेमघर, वरसगाव अणि पानशेत या धरणांच्या पाणलोट परिसरात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. रात्री सर्वाधिक पाऊस टेमघर धरणात झाला, तेथे ११२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चारही धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या खडकवासला धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून तेथून ७ हजार ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला प्रकल्पातील चार धरणात मिळून एकूण पाणीसाठा ४१ टक्के म्हणजे ११.९३ टीएमसी इतका झाला आहे. मंगळवारी दिवसभर धरण क्षेत्रात मध्यम पाऊस झाला. खडकवासला धरण परिसरात मंगळवारी दिवसभरात ११, पानशेतमध्ये ५३, वरसगावमध्ये ५२ आणि टेमघरमध्ये ३४ मिमी पाऊस झाला. ओढे-नाल्यांमधून वेगाने पाणी वाहत असल्याने धरणातील पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. खडकवासला धरण ७७ टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी सकाळी ६८४ क्युसेकने पाणी सोडले. ९ वाजता ३ हजार ८८३ क्युसेकने तर दुपारी एक वाजता ७ हजार ७०० क्युसेकने पाणी सोडले.