Khadakwasla: खडकवासलातून यंदा उन्हाळी आवर्तन बंद
Khadakwasla:

Khadakwasla: दुष्काळामुळे यंदा खडकवासला धरणातून कालव्याद्वारे उन्हाळी आवर्तन दिले जाणार नाही. त्यामुळे उन्हाळी आवर्तनातून सिंचन होणाऱ्या पाच तालुक्यातील अडीच लाख हेक्टर शेतीला फटका बसणार आहे.
खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमधील पाणी पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यासह हवेली, पुरंदर, दौंड, बारामती व इंदापूर या चार तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्यासाठी वापरले जाते. या चारही धरणांमध्ये एकूण २९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असतो.
यंदा पावसाळ्यात चारही धरणे काठोकाठ भरली. पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे मुठा नदीतून सुमारे १९ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र, त्याच दरम्यान हे अतिरिक्त पाणी कालव्यातूनही सोडण्यात आले.
रब्बीचे आवर्तन सुरू होण्यापूर्वी सुमारे ६.३८ टीएमसी पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले होते. या चारही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने या कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा फायदा खरिपातील पिकांना झाला.
यंदा रब्बीचे आवर्तन २५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. हे आवर्तन ४५ दिवस सुरू राहणार असून दररोज सुमारे ११०० क्युसेकने हे पाणी सोडण्यात येत आहे. सुमारे चार टीएमसी पाणी पहिल्या आवर्तनातून देण्यात येणार असून पाण्याच्या उपलब्ध साठ्यावर त्यात बदल केला जाईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.





