Pune : सातबारा उतारा आणखी स्पष्ट, सुटसुटीत

पुणे : सातबारा उताऱ्यावर अपाक शेरा, एकमॅ नोंद, तगाई कर्ज, बंडींग कर्ज, भूसुधार कर, इतर पोकळीस्त नोंदी अशा कालबाह्य नोंदी आहेत. या कालबाह्य नोंदीमुळे शेतकऱ्यांना जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार अथवा कर्ज प्रकरणे, भूसंपादन नोबदला आदी कामकाजावेळी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. या सर्व पार्श्वभूमीवर सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य व निरुपयोगी नोंदी कमी करण्याची मोहीम राबविण्याची सूचना महसूल विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना दिली आहे. सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य आणि अनावश्यक नोंदी कमी झाल्यामुळे सातबारा उतारा अधिक स्पष्ट अन् सुटसुटीत होणार आहे.
राज्य शासनाच्या महसूल विभागाने जिवंत सातबारा उतारा ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. आता मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी करून सातबारा उतारा अद्ययावत करण्यात येणार आहे. सातबारा उताऱ्यावर त्या-त्या काळात अनेक नोंद घेण्यात आल्या. आता कालानुरूप या नोंदी कमी करण्यासाठी तहसीलदार अथवा प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागावी लागते. या प्रक्रियेसाठी दोन ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. आता मात्र सातबारा उतारे अद्ययावत करण्याच्या मोहिमेमुळे साताबारा उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी होणार आहे.
शासनाच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल विभागाचे कार्यासन अधिकारी प्रतापसिंह खरात यांनी जारी केला आहे. तसेच, या संदर्भात महसूल अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हाधिकारी यांनी प्रशिक्षण द्यावे, व यामध्ये कालबाह्य नोंदी कमी करताना कायदेशीर बाबी समजावून सांगाव्यात, असेही शासनाने म्हटले आहे.
महिला वारसांची नावे भोगवटादार सदरी
हिंदू वारस कायदा 1956 अनुसार वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वडिलांचे निधनानंतर मुलींना समान हक्क प्राप्त होतात. त्यामुळे वारस नोंदी घेताना महिला वारसांची नावे इतर अधिकार सदरी न घेता भोगवटादाराचे नाव सदरी येणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा सर्व वारस नोंदींची खात्री करावी व इतर अधिकार सदरी असलेली महिला वारसांची नावे वाजवी दुरुस्तीची कार्यवाही करून भोगवटादार सदरी घ्यावीत, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
ही कामे होणार
– अपाक शेरा कमी करणे, एकुमॅ (एकत्र कुटुंब मॅनेजर), तगाई कर्जाच्या नोंदी, नजर गहाण, सावकारी कर्ज, सावकारी अवार्ड, भूसंपादन निवाडा व बिनशेती आदेशानुसार कजापचा प्रलंबित अंमल सातबारा उताऱ्यावर घेणे, पोट खराब नोंदी घेणे, नियंत्रित सत्ता प्रकार शेरे प्रकार निहाय पडताळणी करून सातबारा उताऱ्यावर अंमल घेणे, भोगवटादार वर्ग 1 व भोगवटादार वर्ग 2 असे स्वतंत्रपणे भूधारणा प्रकारनिहाय सातबारा उतारा तयार करणे, गावातील सार्वजनिक जागा जसे की स्मशानभूमी, रस्ते, पाणीपुरवठा यांच्या नोंदी घेणे
या होणार फायदा
– सातबारा उतारा समजण्यास सोपा होणार
– सातबारा उतारा स्पष्ट होणार
– अनावश्यक नोंदी कमी झाल्यामुळे मालकी हक्कासंबंधीचे वाद कमी होण्यास मदत होणार
– शासकीय योजना आणि विकास कामांसाठी जमिनीची अचुक आकडेवारी उपलब्ध होणार




