Pune : अकरावीसाठी कोटाअंतर्गत ६० हजार प्रवेश निश्चित

पुणे – केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत इयत्ता अकरावीसाठी विविध कोटाअंतर्गत एकूण १ लाख १३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांचे प्रवेश संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात निश्चित झाले आहेत. ५२ हजार ५६१ विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज करून प्रवेश घेण्याकडे पाठ फिरवली आहे.
इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली. त्यामध्ये विद्यार्थी एकूण प्रवेश क्षमता २१ लाख २३ हजार ४० असून त्यापैकी कॅप फेरीसाठी प्रवेश क्षमता १८ लाख ९७ हजार ५२६ तसेच कोटा प्रवेश क्षमता २ लाख २५ हजार ५१४ इतकी आहे. एकूण विद्यार्थी नोंदणी १२ लाख ७१ हजार २९५ इतकी झालेली आहे.
विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक, इन-हाऊस, व्यवस्थापन या कोटांतर्गत कनिष्ठ महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी १२ ते १४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार दिलेल्या कालावधीमध्ये काही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित केला आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.
कोटाअंतर्गत प्रवेशाचा तपशील
कोटाअंतर्गत प्रवेशाचा प्रकार – अर्ज केलेले विद्यार्थी – एकूण प्रवेशित विद्यार्थी
इन-हाऊस – ५२४६८ – २६५२१
व्यवस्थापन – २३५८९ – ७७५६
अल्पसंख्यांक – ३६९९१ – २६२१०
एकूण – ११३०४८ – ६०४८७





