पुणे – पोलिसांनी टिपू पठाण टोळीच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. टोळीतील सदस्य असलेल्या शाहरूख शेखचा रविवारी सोलापुरात एन्काउंटर करण्यात आला. त्यानंतर टोळीशी संबंधित ६० सदस्यांची झाडाझडती घेण्यात आली. त्यांना काळेपडळ पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आल्यानंतर प्रत्येकाची कुंडली तयार करण्यात आली आहे. एन्काउंटरच्या भीतीने आरोपी हजर वीस लाखांच्या खंडणी प्रकरणात टिपू पठाणसह १७ जणांवर मोक्का लावण्यात आला होता. यामध्ये पठाणसह ९ जणांना अटक केली होती. मात्र, शाहरूखसह आठ सदस्य मागील तीन महिन्यांपासून फरार होते. शाहरूखचा एन्काउंटर झाल्याने फरार आरोपींची संख्या सात झाली होती. मात्र, एन्काउंटरची खबर मिळताच फरार राजेश पवार स्वत:हून पोलिसांत हजर झाला. उर्वरीत सदस्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. अशी तयार होणार कुंडली पठाण टोळीतील ६० सदस्यांना दिवसभरात दोन वेळा हजेरीला बोलावण्यात आले. त्यांच्यावर दाखल गुन्हे, त्यांचा सध्याचा पत्ता, मोबाइल नंबर, छायाचित्र आणि जवळच्या नातेवाईकांची माहिती नोंदवली जात आहे. शाहरूखच्या एन्काउंटरनंतर पोलिसांचा निरोप पोहोचता क्षणी ते ठाण्यात हजर झाले. यापूर्वी टिपू पठाणचीही धिंड काढण्यात आली होती. अंत्यसंस्कार सूचनेप्रमाणेच शाहरूखच्या अंत्यसंस्कारात कोणतीही गडबड, शक्तिप्रदर्शन नको, असे पोलिसांनी बजावले होते. टोळीतील सदस्यांबरोबर नातेवाईकांनाही तसा निरोप दिल्याने अंत्यसंस्कार निवडक २५ नातेवाईकांच्या उपस्थितीत झाले. मध्यंतरी एका गुंडाच्या अंत्यसंकाराला शेकडो तरुणांनी रॅली काढल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आधीच खबरदारी घेतली. हम खडे तो पोलिसांचे फटके पडे! शाहरूखच्या उदात्तीकरणाचे रील्स ज्या तीन जणांनी स्टेटसला ठेवले, त्यांना काळेपडळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर अगोदर कोणते गुन्हे दाखल नाहीत. दोघे विद्यार्थी आहेत. एकाने मिस यू नंबरकारी, तर दुसऱ्याने हम खडे तो सरकार पडे, असे स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस व्हायरल झाल्यावर पोलिसांच्या सोशल मीडिया सेलने स्टेटस त्यांचा माग काढून ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवला. शाहरूखने ४ गोळ्या झाडल्या सराईत गुंड शाहरुख ऊर्फ अट्टी शेख याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर त्याने चार गोळ्या झाडल्याचे पुढे आले आहे. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. या वेळी पोलिसांकडून देखील पाच राउंड फायर करण्यात आल्याची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आली आहे.