Pune : बोपदेव घाट प्रकरण तपासासाठी ४४ विस्थापितांना ‘मोकळीक’

संजय कडू
पुणे – बोपदेव घाटातील बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांना अजूनही आरोपींचा माग लागलेला नाही. यामुळे तपास पथकांची संख्या दहावरून २५ आणि आता ७० पर्यंत वाढवण्यात आली आहे. तरीही कोणतेच धागेदोरे मिळत नसल्याने पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी चक्क बदनाम म्हणून ‘साइड ब्रँच’ला वर्ग केलेल्या ४४ विस्थापितांना तपासासाठी पुन्हा ‘प्रस्थापित’ केले आहे.
त्यांना त्यांच्या जुन्या हद्दीत मुक्तपणे वावर करण्यास मोकळीक दिली आहे. त्यांचे चांगल्या-वाईट लोकांशी असलेले सगळे संबंध वापरुन या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे “बदनाम हुअे तो क्या हुआ काम तो आ गये’ असे म्हणत हे विस्थापित पुन्हा नव्या जोशाने कामाला लागले आहेत.
या प्रकरणी सात दिवसांत पोलिसांच्या तपासात थोडीशीही प्रगती झाली नाही. मागील काही वर्षांत पोलिसांचा तपास पूर्णपणे तांत्रिक विश्लेषणावर आधारित झाला आहे. यामुळे खबऱ्यांचे जाळे आणि खबऱ्यांना जपणे हा पारंपरिक तपासाचा प्रकार जवळपास बंदच झाला आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज नाहीत, घटनास्थळी मोबाइलला रेंज नसल्याने घटनास्थळावरचा “डंम्प डेटा’ नाही. तसेच आरोपी कोणत्या वाहनाने आले, ते कोणत्या दिशेने गेले हे हे पीडित तसेच फिर्यादीला माहिती नाही.
तर, ताब्यात घेतलेल्या २०० सराईतांमध्ये एकही संशयित आढळलेला नाही. यामुळे तपास जवळपास ठप्प आहे. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपासाची आशा जवळपास सोडली आहे. त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या तपास पथकांना तसेच गुन्हे शाखेच्या तपास पथकांना पारंपारिक पद्धतीने तपास करण्याच आदेश दिले आहेत.
आरोपी शोधण्यासाठी आता खबरींचे नेटवर्क ही एकच आशा आहे. यामुळे ग्रामीण पोलिसांचीही तपासात मदत घेण्यात येत आहे. विस्थापित झालेल्या ४४ कर्मचाऱ्यांबरोबरच जे कर्मचारी बदलून नवीन ठिकाणी आहेत, मात्र त्यांचे जुन्या हद्दीत चांगले नेटवर्क आहे, अशांना त्यांच्या जुन्या हद्दीत तपासानिमित्त काम करण्याची मुभा दिली गेली आहे.
दरम्यान, घाट परिसर संपल्यावर सासवड आणि कोंढवा परिसरातील तीन हजार मोबाइलचा “डंम्प डेटा’ गोळा करण्यात आला आहे. मागील १५ दिवसांत बोपदेव घाटामार्गे गेलेल्या मोबाइल वापरकर्ते, त्यांचे नाव, पत्ते याबाबतच्या माहितीचे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. यासाठी पोलीस दल अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर करत आहे.
‘एआय’चा वापर अशक्य
आरोपींच्या शोधासाठी “एआय’ अर्थात आर्टिफिशिअल इंटिलेजन्स तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार अशी माहिती होती. मात्र, “एआय स्वत:हून कार्यरत राहून एखादा टास्क पूर्ण करू शकत नाही. त्याला आधी काहीतरी फीडबॅक द्यावा लागतो. यानंतरच ती यंत्रणा कार्यरत होते. यासाठी पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज नाही मग “एआय’ काम कसे करणार?. यामुळे या तपासात या तंत्रज्ञानाचा वापर अशक्य आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दहा लाखांचे बक्षीस देणार कोण ?
या आरोपींची माहिती देणाऱ्यांना दहा लाखांचे बक्षीस जाहीर झाल्याचे वृत्त होते. मात्र, पोलीस आयुक्तालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी माहिती दिली जात होती. यात असे कोणतेही बक्षीस जाहीर केले नसल्याचे ,तर दुसरा अधिकारी बक्षीस जाहीर केले असल्याचे सांगत होता. मात्र, त्यासंदर्भातील आदेश रात्री उशिरापर्यंत काढण्यात आले नव्हते.
आरोपीला एन्काउंटरची भीती
आरोपींनी गुन्हा करताना तो गांभीर्याने घेतला नसेल, मात्र पोलीस त्यांचा कसून शोध घेत असल्याची माहिती त्यांना नक्कीच मिळाली असेल. बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही एन्काउंटरची भीती सतावत असेल. यामुळे ते कदाचित ग्रामीण पोलीस किंवा इतर जिल्ह्यांतील पोलिसांकडे शरण जाऊ शकतात, अशी शक्यता एका अधिकाऱ्याने वर्तवली.





