Pune: ४२ कोटींचा खर्च पाण्यात…? सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी

पुणे – शहरातील सर्वाधिक वाहनांची संख्या असलेल्या सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने फन टाइम ते राजाराम पुलादरम्यान शहरातील सर्वाधिक लांबीचा उड्डाण पूल उभारला. मात्र, तरीही सकाळी धायरीकडून स्वारगेटकडे येणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड कोंडीचा सामना करावा लागत आहे.
गोयल गंगा चौक ते इनामदार चौक हा उड्डाण पूल सुरू झाल्यानंतर सकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहने राजाराम पुलावरून कर्वेनगरकडे जात असतात. मातोश्री वृद्धाश्रमासमोर ही वाहने कोंडीत अडकतात आणि तीच कोंडी पुढे नवीन उड्डाण पुलावर पोहोचते.
याशिवाय सकाळच्या वेळी या रस्त्यावर जड वाहनांना बंदी असतानाही सिमेंट मिक्सर ट्रक सर्रास धावत असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. पोलिसांकडून मात्र त्यावर कारवाई होत नसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
सिंहगड रस्त्यास पर्यायी रस्ता नसल्याने आणि वाहनांची प्रचंड वर्दळ लक्षात घेऊन महापालिकेने तब्बल ११८ कोटी रुपये खर्चून उड्डाण पुलांची निर्मिती केली. त्यात राजाराम पूल चौकातील ५२० मीटर लांबीचा पहिला टप्पा १५ कोटी रुपये खर्चून उभारला.
दुसरा टप्पा विठ्ठलवाडी ते फन टाइमदरम्यान २.१ किलोमीटर लांबीचा असून, त्यावर ६१ कोटी रुपये खर्च झाले, तर तिसरा टप्पा गोयल गंगा चौक ते इनामदार चौक या १.५४ किलोमीटर लांबीच्या पुलासाठी ४२ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
या पुलांमुळे वाहनांचा वेग वाढला असला, तरी पुढील चौकातील अडथळे दूर करण्याची जबाबदारी पोलीस आणि महापालिकेकडून पार पाडली गेली नाही. परिणामी आता कोंडी उड्डाण पुलावर पोहोचली असून, वाचणारा २० ते २५ मिनिटांचा वेळ वाहनचालकांना पुन्हा कोंडीत वाया जात आहे.
बाॅटलनेक फुटेना?
सिंहगड रस्त्यावरून आलेल्या वाहनांपैकी सुमारे ७५ टक्के दुचाकी राजाराम पुलावरून कर्वेनगर व डीपी रस्त्याने पुढे जातात. ही वाहने मातोश्री वृद्धाश्रमासमोरून जाताना अडकतात. सकाळी साडेआठ ते दहा या वेळेत या ठिकाणी प्रचंड कोंडी होते. त्याच वेळी कर्वेनगरमधून महालक्ष्मी लॉन्समार्गे स्वारगेट व सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहनेही याच सर्कलकडे वळतात. तेथे समोरासमोर येणाऱ्या वाहनांमुळे गोंधळ वाढतो.
डीपी रस्त्यावरून आलेली व कर्वेनगरकडे जाणारी वाहनेही याच चौकात अडकतात. पोलीस उपस्थित असूनही कोंडी सुटत नाही. पर्याय म्हणून पोलिसांनी कर्वेनगरमधून आलेल्या वाहनांना पुढे शंभर मीटरवरून वळसा घालण्याचे मार्गदर्शन केले असले, तरी कोंडी कायम राहात असून, मागे नवीन उड्डाण पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात.
सिग्नलच्या वेळेत बदलाची गरज
राजाराम पूल चौकात स्वारगेटकडे जाण्यासाठी उड्डाण पूल असल्याने पोलिसांनी खालील रस्त्यावरील सिग्नलची वेळ कमी केली आहे. परिणामी पूलाखालून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस, टेम्पो, तसेच इतर मालवाहतूक वाहनांच्या रांगा वाढत आहेत. अशा वेळी मागून आलेली वाहने पुलावर अडकतात आणि उड्डाण पुलाचा उद्देश फोल ठरतो.
‘मंगळवारी राजाराम पुलाजवळच ट्रक बंद पडला होता. त्यामुळे पुलावर वाहतूक कोंडी झाली. त्याच वेळी महापालिकेकडून रस्त्यांचे काम सुरू असल्याने काही वेळ रस्त्यावर कोंडी झाली होती. ट्रक बाजूला करत कोंडी सुरळीत करण्यात आली आहे.’ – सुनील गवळी (पोलीस निरीक्षक, सिंहगड वाहतूक विभाग)





