पुणे : पूरस्थितीला सामोरे जाणाऱ्या एकतानगर, विठ्ठलनगर व निंबजनगर या मुठा नदीलगतच्या नागरिकांच्या पूरमुक्तीसाठी महापालिकेने नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी ३६९ कोटींचा खर्च अपेक्षीत असून त्याला पूर्वगणन समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पुरात राहवे लागणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. पालिकेच्या नदी सुधार प्रकल्पांत मुळा, मुठा व मुळा-मुठा या नद्यांच्या ४४ किलोमीटर लांबीच्या पट्ट्याचा समावेश आहे. हा प्रकल्प ११ टप्प्यांमध्ये विभागला आहे. त्यातील संगमवाडी ते बंडगार्डन हे काम अंतीम टप्प्यात असून बंडगार्डन ते मुंढवापर्यंतचे काम वेगाने सुरू आहे. त्यानंतर आता पालिका सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द ते राजाराम पूल या दोन्ही बाजूचा ४.१ किलोमीटरचा नदीकाठ विकसित करणार आहे. ३०० कोटींची मागणी गतवर्षी २४ व २५ जुलै २०२४ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे साखळी धरणात पाणी मोठ्या प्रमाणावर आले. तेथून मोठा विसर्ग केल्याने शहरात विशेषतः सिंहगड रस्त्यावरील मुठा नदीलगतच्या एकतानगर, विठ्ठलनगर आणि निंबजनगर या सखल भागांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक इमारती व वस्त्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी दौरा केला होता. तसेच पूरस्थिती रोखण्यासाठी शासनाकडून सर्वोत्परी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर यंदाही या भागात काही सोसायटयांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. त्यामुळे ही पूरस्थिती रोखण्यासाठी तसेच नदीकाठ विकसन प्रकल्प राबविण्य़ासाठी पालिकेने शासनाकडे आपत्ती व्यवस्थापन निधीतून ३०० कोटींची तरतूद करण्याची मागणी केली आहे. हा प्रस्ताव २६ जून २०२५ रोजी नगरविकास विभागाकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. वडगाव खुर्द ते राजाराम पूल या ४.१० किलोमीटर लांबीच्या स्ट्रेच-६ मध्ये मुठा नदीलगत कामे करण्यात येणार आहेत. या कामांत दोन्ही काठांवर ‘एम्बॅंकमेंट’ करून पूरवहन क्षमता वाढविणे, नागरिकांसाठी पाथ वे, घाट तसेच सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे नदीकाठी असलेल्या वस्त्यांना पुरापासून संरक्षण मिळेल, असे पालिकेचे म्हणणे आहे.या प्रकल्पासाठी सुरुवातीला ३०० कोटींचा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र तपशिलवार पूर्वगणनपत्रकानुसार हा खर्च ३६९ कोटींवर गेला आहे.